कारवाईमुळे आता तरी सुधरा’ असा इशाराच पोलिस आयुक्तांनी दिल्याची चर्चा
marathinews24.com
पुणे – अवैध धंद्याला पाठबळ देत हॉटेल व्यावसायिकाकडून हप्ता घेणाऱ्या काळेपडळ पोलिस ठाण्यातील श्रेणी पोलिस उपनिरीक्षकाला पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे. शरद निवृत्ती नवले असे निलंबित पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कारवाईमुळे आता तरी सुधरा’ असा इशाराच पोलिस आयुक्तांनी दिल्याची चर्चा पोलिस दलात आहे.
ससूनमध्ये नवजात मुलाला सोडून आई पसार – सविस्तर बातमी
महंमदवाडीतील बीबीसी रूफटॉप किचन अँड बार हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा व काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी १६ टेबलांवर ५७ तरुण-तरुणी हुक्का सेवन करत असल्याचे आढळून आले होते. हुक्का पार्लरवरील पुण्यात सर्वात मोठी हुक्का कारवाई होती. दरम्यान, हॉटेलचे मालक पार्थ अनिल वाल्हेकरने त्याच्याकडील चौकशीत सांगितले की, एप्रिल २०२५ मध्ये हॉटेलमध्ये हुक्का विकण्यास सुरुवात केली. त्याबाबत पोलिस उपनिरीक्षक शरद नवले याच्याशी बोलणे झाले होते.
हुक्का पार्लर सुरुनकेल्याबद्दल गुडलकचे ३० हजार व एप्रिल महिन्यांचे ३० हजार असे ६० हजार रुपये १० एप्रिल २०२५ रोजी त्यांनी रोख स्वीकारले होते. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे हनुमंत गायकवाड पाटील यांनी हॉटेल मालकाला १२ मे रोजी फोन करुन नवले यांनी मे महिन्याचा हप्ता ३० हजार रुपये पाठवण्यास सांगितले आहे, असे सांगितले. त्यांच्यामार्फत नवलेने ऑनलाईन ३० हजार रुपये स्वीकारले.
शरद नवले याने हॉटेल मालकाला बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करण्यास प्रोत्साहन देऊन त्याबदल्यात त्याच्याकडून ९० हजार रुपये स्विकारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन केल्याने शरद नवले याला पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे.याआधीही पोलिस आयुक्तांनी हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना, तो मेसेज हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेल मालकाला पाठवून सावध केल्याप्रकरणी एका श्रेणी पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस अंमलदाराला निलंबित करण्यात आले होते.