सराईत टोळीला बेड्या, पिस्तूलांसह काडतुसे जप्त
marathinews24.com
पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठा शस्त्रसाठा जप्त करीत सराईत टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ४ पिस्तूल, ६ काडतुसे असा मिळून पावणेदोन लाखांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. संबंधित सराईत टोळीने मध्यप्रदेशातून ही पिस्तूले आणल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे यांनी दिली आहे. टोळीकडून पिस्तूलांचा वापर कशासाठी केला जाणार होता, याचा तपास केला जात आहे.
महाविद्यालयीन तरुणावर वार करुन खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी
सुफियान बशीर शेख (वय २२ रा. धनकवडी) नीलेश प्रभुलिंग कुंभार (वय २१ रा. बालाजीनगर) तुकाराम बाबासाहेब गवते (वय १९ रा. बालाजीनगर) ऋषभ उर्फ ऋषी शिवाजी भगत (वय २३ रा. त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ चौक) अमित राजाराम पिलावरे (वय २५ रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनीट दोनचे अमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार शिवानंद कायगुडे आणि उज्ज्वल मोकाशी यांना सहकारनगरमधील वनशीव वस्तीजवळ पिस्तूल बाळगणार्यांची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
युनीट दोनने पाचही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून ४ पिस्तूलांसह ६ काडतुसांचा साठा जप्त केला. चौकशीत त्यांनी हे पिस्तूल मध्यप्रदेशातून आणल्याची कबुली दिली आहे. या शस्त्राचा वापर कशासाठी केला जाणार होता, कोणावर हल्ला केला जाणार होता का, याबाबत तपास केला जात आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, एसीपी राजेंद्र मुळिक, वरिष्ठ निरीक्षक राहूल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, उपनरीक्षक तेजस्वी पवार, शंकर नेवसे, कुंदन शिंदे, नागनाथ राख, विनोद चव्हाण, संदीप शिर्वेâ, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, ओमकार कुंभार, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार, विनायक वगारे यांनी केली.
पुण्यात सहकारनगर परिसरातून पाच जणांना अटक करीत पिस्तूलासह कातडुसांचा साठा जप्त केला आहे. त्यांनी मध्यप्रदेशातून पिस्तूले आणल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील काही आरोपी सराईत असून, त्यांच्याकडे आणखी तपास केला जात आहे.
राहूल खिलारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनीट दोन





















