‘आयसीएमएआय’च्या वर्धापनदिनानिमित्त कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन
marathinews24.com
पुणे – दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे चॅप्टरच्यावतीने पहिल्यांदाच कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. मुलांसाठी स्केचिंग, टॅटू, फोटोसेशन, तसेच सीएमए व्यवसायाविषयी कुटुंबियांच्या भावना मांडणारे पॉडकास्ट अशा विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे व संवाद सत्रांचे आयोजन केले होते. सीएमए हे केवळ प्रोफेशन नाही, तर एक कुटुंब आहे, या भावनेतून जवळपास २०० पेक्षा अधिक लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
तपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा-आमदार रोहित पवार – सविस्तर बातमी
कर्वेनगर येथील सीएमए भवन येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी ‘आयसीएमएआय’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीएमए नीरज जोशी, माजी अध्यक्ष सीएमए धनंजय जोशी, सीएमए डॉ. संजय भार्गवे, आयसीएमएआय पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, उपाध्यक्ष सीएमए राहुल चिंचोळकर, सचिव सीएमए हिमांशू दवे, सीएमए अमेय टिकले यांच्यासह सीएमए सदस्य, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात हास्ययोग प्रशिक्षक व प्रेरक वक्ते मकरंद टिल्लू यांचे ‘हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा’ या विषयावर व्याख्यान झाले.
मकरंद टिल्लू म्हणाले, “आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आनंदी राहणे आणि इतरांनाही आनंद देणे आवश्यक आहे. हसण्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. नियमित हास्यामुळे तणाव कमी होतो, मन प्रसन्न राहते आणि आरोग्य अधिक सुदृढ बनते. जीवनात आनंदी राहण्यासाठी ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ वाढवायला हवा, त्यासाठी मनमुराद हसायला हवे.” आपल्या खुमासदार शैलीत दैनंदिन जीवनातील ताणतणाव, नातेसंबंध आणि आनंदी जीवनशैली यांवर त्यांनी भाष्य केले.
सीएमए नीरज जोशी म्हणाले, आज ‘आयसीएमएआय’ यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. मात्र, त्यामागे अनेक वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत, समर्पण आणि एकजुटीची ताकद आहे. सीएमए होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून, लाखो लोक परीक्षेला बसताहेत, ही समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
सीएमए डॉ. संजय भार्गवे म्हणाले, ‘आयसीएमए’ ही केवळ एक संस्था नसून, एक कुटुंब आहे. येथे प्रत्येक सदस्य एकमेकांशी व्यावसायिक नात्यासह भावनिक बंध, आपुलकी आणि परस्पर सहकार्याच्या नात्यानेही जोडला आहे. प्रत्येक उपक्रमामध्ये सदस्यांचा सहभाग, एकमेकांप्रती सन्मान आणि संकटकाळात मिळणारी साथ हीच ‘आयसीएमएआय’ची खरी ताकद आहे.
सीएमए धनंजय जोशी यांनी ‘आयसीएमएआय’ पुणे चॅप्टरच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पुण्याने दिलेले ‘सीएमए इज मोर दॅन प्रोफेशन… इट्स अ फॅमिली’ हे घोषवाक्य देशभर घेऊन जावे, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या साठ वर्षात पुणे शाखेने उत्तम प्रगती करीत व्यवसायाबरोबरच कौटुंबिक स्नेह जपण्यात घेतलेला पुढाकार आनंद देणारा आहे.
सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली यांनी स्वागत-प्रास्ताविकात सीएमए सदस्यांसोबतच त्यांच्या कुटुंबियांना या आनंदात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजिल्याचे सांगितले. सीएमए अमेय टिकले यांनी सूत्रसंचालन केले. सीएमए राहुल चिंचोळकर यांनी आभार मानले. केक कापून संस्थेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.





















