उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात प्रकरण, हातात कुलूप घेउन थेट सीआयडी कार्यालयात
marathinews24.com
पुणे – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला चार महिने उलटले आहेत. मात्र, प्रदीर्घ कालावधी उलटूनही संवेदनशील प्रकरणात सीआयडीकडून ठोस माहिती किंवा प्रगती अहवाल आतापर्यंत आला नाही. तपास यंत्रणांकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत आमदार रोहित पवार यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. त्यांनी शुक्रवारी (दि.२९) आक्रमक भूमिका घेत हातात कुलूप घेउन सीआयडी कार्यालय गाठले. तपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा, अशी मागणी त्यांनी केली.
मोबाईल हॅक करून महिलेला पावणेसहा लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
आमदार रोहित पवार म्हणाले, राज्याच्या महत्त्वाच्या नेत्याच्या अपघाती मृत्यूला चार महिने पूर्ण होऊनही अद्याप सत्य बाहेर का आले नाही. या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे. तो तपास कुठपर्यंत पोहोचला, याची सविस्तर माहिती जनतेला मिळणे हा त्यांचा हक्क आहे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सीआयडी कार्यालयात जाताना पवार यांनी आपल्या हातात कुलूप घेतले होते. तपास यंत्रणांच्या ढिसाळ आणि अकार्यक्षम कारभाराचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे प्रतिकात्मक आंदोलन केले. रोहित पवार अचानक हातात कुलूप घेऊन सीआयडी कार्यालयात दाखल झाल्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांची तारांबळ उडाली होती.
सीबीआयकडे तपास देण्याची मागणी
पुर्वीच्या काळात सीआयडी तपासासाठी महत्वाची भूमिका कामगिरी करीत होते. आता त्यांच्याकडून जबाबदारीने काम केले जात नाही. अजित दादांच्या निधनानंतर तपास काय झाला, याच्या माहितीसाठी आम्ही चार महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत. आम्ही आज सीआयडी कार्यालयात अधिकार्याला प्रश्न विचारला असता ते अधिकारी आमच्यावर ओरडले. जो विभाग काम करीत नसेल तर ते बंद करा, असे मोदी म्हणाले आहेत. त्यानुसार हा विभाग काम करीत नाही, तो तातडीने बंद करावा. हा तपास सीबीआयकडे तपास द्या, व्ही. के. सिंग याच्यावर कारवाई करा. तपासात काय प्रगती झाली याची माहिती आता मी सीआयडीकडे माझ्या नावाने आरटीआय करणार, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
तपास योग्य दिशेने, वेगाने सुरू आहे- सीआयडी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेप्रकरणी योग्य दिशेने तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे (सीआयडी)दिली आहे. तपासाच्या अनुषंगाने सीआयडीकडून विविध विभाग, संस्थांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. एएआयबी, डीजीसीए, एफएसएल संस्थेशी संपर्क साधून, तपासात लागणर्या अहवालांचा पाठपुरावा करीत असल्याचे स्पष्टीकरण सीआयडीने दिले आहे.
त्यांच्या पक्षाचा रिमोट कंटोल भाजपकडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पार्थ पवार हे त्यांच्या नेत्याच्या मार्गदर्शनात काम करीत नाहीत. ते भाजपच्या मार्गदर्शनात काम करीत आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत पक्ष राहणार नाही. त्यांच्या पक्षातील काही दोन ते तीन नेते यांचे महत्व कमी झाले आहे. त्यामुळे पक्ष आणखी अडचणीत आणत आहेत. पक्षाचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे, असेही रोहित पवार म्हणाले.





















