व्हिडीओ व्हायरल करून गुन्हेगाराला पाठबळ देण्याचा प्रयत्न; येरवडा पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – शहरातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण भिंतीलगत फटाके उडवून जेलमधील आरोपीचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करत गुन्हेगारीचे समर्थन केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. शंकर बाळासाहेब भालके (वय १९, रा. धनकवडी) याला अटक केली आहे.
फरार आरोपीसह दोघांना अटक; ३ पिस्टल जप्त – सविस्तर बातमी
येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपीने एक व्हायरल व्हिडिओ केला होता. त्यानुसार पथकाने शंकर भालके याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सुलतान सय्यद याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण भिंतीजवळ वाहतुकीस अडथळा निर्माण करत फटाके फोडले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. जेलमधील आरोपीचे उदात्तीकरण करून समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
येरवडा पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारांचे समर्थन किंवा उदात्तीकरण करणाऱ्यांवर तसेच अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, एसीपी सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते, पोलिस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलिस हवालदार पिलाणे, पोलिस अंमलदार मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोनगे, संदीप जायभये, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल म्हन्हाळकर सोमनाथ गायकवाड यांनी केली.
























