वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत अधिकारी आणि नागरिक यांच्यासोबत बैठक
marathinews24.com
पुणे – आगामी काळ हा सण-समारंभाचा काळ आहे. त्यामुळे या काळात नागरिक खरंदीसाठी बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी कोथरुड मध्ये ५० वॅार्डनची नियुक्ती करा, असे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृती – सविस्तर बातमी
कोथरुड मधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, पुणे महानगरपालिका शहर मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, क्षेत्रीय उपायुक्त यांच्या सह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक तथा कोथरुड मधील विविध सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूककोंडीच्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने आंबेडकर चौक परिसर, एरंडवणे गुळवणी पथ, एमआयटी कॅालेज परिसर, पौड रोड, कर्वेरोड, कोथरुड डेपो आदी भागातील वाहतूक कोंडीच्या समस्या मांडल्या. त्यावर ना. पाटील यांनी सर्व समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
आंबेडकर चौक भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच, भविष्याचा विचार करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच, एमआयटी कॅालेजजवळ बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. त्यासोबतच भरधाव वाहनांसाठी गतिरोधक उभारण्याच्या सूचना दिल्या. तसेच, वाहतूक कोंडीला कारण ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. त्यासोबतच , आगामी काळ हा सण-समारंभाचा काळ आहे. त्यामुळे या काळात नागरिक खरंदीसाठी बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी कोथरुड मध्ये ५० वॅार्डनची नियुक्ती कराव्यात असे निर्देशही या बैठकीत दिले.
यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ना. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपाययोजनांचे कौतुक करून आभार मानले. तसेच, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या तथा नो पार्किंग मध्ये गाडी लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक विभागाने PTP traffic हे ॲप कार्यन्वित केले असून; या ॲपवर आजपर्यंत ४५०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३२०० जणांवर कारवाई झाली असल्याची माहिती देत, नागरिकांनी याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. त्यासोबतच एफसी रोड येथे AI कॅमेरा कार्यान्वित करुन वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून, उर्वरित पुणे शहरातही कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, आजच्या बैठकीत प्राप्त तक्रारी तथा वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा दर दहा दिवसांनी आढावा घेणार असल्याचे ही त्यांनी यावेळी बैठकीत नमूद केले.