चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या घटनेत रिक्षा चालकासह दुचाकीस्वार तरुणाला लुटण्यात आल्याच्या घटना घडल्या. बिबवेवाडी, तसेच हडपसरमधील फुरसुंगी परिसरात लुटमारीच्या घटना घडल्या. बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर परिसरात एका रिक्षाचालकाला चोरट्यांनी लुटल्याची घटना १२ जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. याबाबत रिक्षाचालक सिद्धेश्वर नरहरी मुंढे (वय १९, रा. आंबेगाव, कात्रज) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाह निमंत्रण पत्रिका उघडणे महागात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक मुंढे अप्पर इंदिरानगर परिसरातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्याला अडवले. चोरट्यांनी त्याला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल आणि रोकड काढून घेतली. मारहाण करुन चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
हडपसरमधील फुरसुंगी परिसरात दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल आणि रोकड असा २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आल्याची घटना घडली. याबाबत ग्रीष्म दिनेश सुराणा (वय २५, रा. दापोडी) याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ग्रीष्म आणि त्याचा मित्र हे ११ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास दुचाकीवरुन निघाले होते. फुरसुंगी परिसरात त्यांना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी अडवले. ग्रीष्म याला मारहाण करुन त्याच्याकडील रोकड आणि माेबाइल संच असा मुद्देमाल लुटून नेण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
























