व्यावसायिकाची ५ लाखांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन पाठविण्यात आलेल्या विवाह निमंत्रण पत्रिकेची लिंक उघडणे महागात पडले. सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाच्या बँक खात्यातून पाच लाख ३० हजार रुपये लांबविले.
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी
या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५६ वर्षीय व्यावसायिक बंडगार्डन रस्ता परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन त्यांना गेल्या महिन्यात विवाह निमंत्रण पत्रिकेची लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक त्यांनी उघडली.
दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ‘रघुनंदन कुमार ॲमेझाॅन फ्राॅड’ असा संदेश त्यांना पाठविण्यात आला. चोरट्यांनी त्यांना एक ‘ओटीपी’ पाठविला होता. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पाच लाख ३० हजार रुपये काढून घेण्यात आल्याचे लक्षात आले. ही रक्कम एका बँक खात्यात जमा करण्यात आली होती. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत. अनाेळखी क्रमांकावर पाठविण्यात आलेेले संदेश, एपीके फाईल उघडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
























