१५ सायकली जप्त
marathinews24.com
पुणे – सायकल चोरीच्या मालिकेचा येरवडा पोलिसांनी छडा लावत एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तब्बल १५ चोरीच्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड आणि नागपूर चाळ परिसरात सातत्याने घडणाऱ्या सायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या तपासातून हा प्रकार उघडकीस आला.
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड आणि नागपूर चाळ परिसरात सायकल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या घटनांचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अल्पवयीन मुलगा चोरी करत असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान संबंधित विधीसंघर्षित बालक आपल्या आजीसोबत नवी खडकी, येरवडा येथे राहत असल्याची माहिती पोलिस अमंलदार बालाजी सोगे व सोमनाथ गायकवाड यांना मिळाली. पोलिसांनी त्याच्या पालक व नातेवाईकांशी संपर्क साधून चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली.
मुलाची आई हयात नसून वडील आणि आजोबा गंभीर गुन्ह्यात कारागृहात असल्याने त्याच्याकडे लक्ष देणारे कोणी नसल्याचे निष्पन्न झाले. मौजमजा करण्यासाठी पैसे मिळावेत या उद्देशाने त्याने सायकल चोरी करण्यास सुरुवात केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पुढील चौकशी केली असता संबंधित बालक दिवसा परिसराची पाहणी करून रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या सायकली चोरत असल्याचे समोर आले. त्याच्याकडून १ लाख रुपयांचा मुद्देमाल असलेल्या १५ सायकली जप्त केल्या आहेत. पोलिस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलिस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, पोलिस निरीक्षक कैलास डाबेराव, उपनिरीक्षक किशोर बेरड, अंमलदार मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, संदीप जायभाये, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, अनिल मनहाळकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.






















