वानवडीत चोरट्यांचा राडा
marathinews24.com
पुणे – शहरातील वानवडीतील परमार पार्क परिसरात पहाटेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून ज्येष्ठ सिव्हिल कंत्राटदार व त्यांच्या कुटुंबीयांना धाक दाखवत तब्बल २७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. याप्रकरणी मनेश शेवंतीलाल शहा (वय ६५, रा. परमार पार्क, फेज-१, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २१) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान चोरटे घरात शिरले. त्यावेळी शहा हे कुटुंबासह घरात झोपलेले असताना तीन अज्ञातांनी बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाची लोखंडी जाळी कापून घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर आरोपींनी शहा व त्यांच्या कुटुंबीयांना धाक दाखवून कपाटातील १७४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने, १३ लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम, पत्नी व सासू यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले. असा २७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन तिघांनी तेथून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पहाटेच्या वेळी संरक्षित समजल्या जाणाऱ्या बंगल्यात घुसून कुटुंबाला धाक दाखवत लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याने वानवडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे तसेच सराईत गुन्हेगारांची माहिती तपासली जात आहे.






















