टिळक रस्त्यासह स्वारगटेमध्ये जेष्ठ महिलांना लुटले
Marathinews24.com
पुणे – महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचा पुणे पोलिसांचा दावा सपशेल फेल होत चालला असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांपासून पादचारी महिलांसह आता बसस्थानकावर थांबलेल्या महिला प्रवाशीही सुरक्षित नसल्याचे चोरीच्या घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कुठे आहेत पुणे पोलीस, कुठे आहे बीट मार्शल, क्राईम ब्रांचची पथके, महिला दामिनी पथकांना मरगळ आली आहे का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. टिळक रस्ता आणि स्वारगेट बसस्थानकातील महिलांचे दागिने हिसकाविण्याच्या घटना घडल्या आहेत.
सोन्याच्या लालसेने शेतकऱ्याचा केला खून – सविस्तर बातमी
पीएमपीएल बसची वाट पाहत थांबलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला लक्ष्य करीत दुचाकीस्वार सोनसाखळी चोरट्यांनी लुटले आहे. शहराच्या मध्यवर्ती टिळक रस्त्यावर ऐन वर्दळीच्या ठिकाणी ११ एप्रिलला रात्री पावणेनउच्या सुमारास दागिने हिसकाविण्याच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. संबंधित ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील २ लाख ४६ हजारांचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी क्षणार्धात हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत सुसाट बाईकस्वार चोरटे नरजेआड झाले. या घटनेमुळे आता स्थानकावर बसची वाट पाहणार्या महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६५ वर्षीय महिला बिबवेवाडीतील असून, ११ एप्रिलला रात्री पावणेनउच्या सुमारास टिळक रस्त्यावरील आयसीआयसी बँकेसमोरील स्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेजवळ येउन दुचाकीचा वेग कमी केला. आजूबाजूला वर्दळ कमी असल्याची संधी साधून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील २ लाख ४६ हजारांचे दागिने हिसकावून नेले. चोरट्यांनी हिसका मारल्यामुळे तक्रारदार महिला कोलमडल्या होत्या. मात्र, त्यांनी स्वतःला सावरत आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार होण्यास यशस्वी ठरले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.
स्वारगेट बसस्टॉपवर महिलेचे दागिने चोरले
पीएमपीएल बसमध्ये शिरत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ५० हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. ही घटना ११ एप्रिलला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी बोपोडीत राहणार्या ६५ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे तपास करीत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून स्वारगेट परिसरात महिलांचे दागिने लुटण्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी चोरट्यांच्या शोध घ्यावा. त्यांच्याविरूद्ध कारवाई करीत अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.