संबंधित पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला आहे. घरफोडीच्या घटना वानवडीतील साळुंखे विहार परिसरासह काळेपडळ परिसरातील पिसोळीत घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटी ९२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८० हजारांची रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना फेबु्रवारी ते २३ सप्टेंबर कालावधीत वानवडीतील साळुंखे विहार रस्ता परिसरातील मेस्ट्रोज सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी मुंबईत राहणार्या ८३ वर्षीय जेष्ठाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करीत आहेत.
घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ४३ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २२ सप्टेंबरला पिसोळीतील बंका सफायर याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिल शेटे तपास करीत आहेत.
लोहगावमध्ये घरफोडी, ५ लाखांचा ऐवज चोरीला
पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, मोबाइल, लॅपटॉपसह ५ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १८ ते २२ सप्टेंबर कालावधीत लोहगावमधील गोविंद रेसीडेन्सीमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगाव शिंदे रस्ता, लोहगावमधील गोविंद रेसीडेन्सीत राहायला आहे. १८ ते २२ सप्टेंबर कालावधीत संबंधित कुटूंबिय बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांचा फ्लॅट बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले. आतमध्ये शिरून मोबाइल, लॅपटॉप, रोकडसह ५ लाख ३० हजारांहून अधिक रकमेची चोरी केली. गावाहून आल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करीत आहेत.
नागरिकांनो सुरक्षितता बाळगा
नागरिकांनो गावी जाण्यापुर्वी आपल्या ऐवजाची सुरक्षितता बाळगणे जबाबदारी आहे. बाहेरगावी जाण्याआधी प्रामुख्याने इमारतीचा सुरक्षारक्षकासह शेजारी राहणार्यांना माहिती द्यावी. जेणेकरून घराजवळ लक्ष ठेवले जाण्यास मदत होईल. त्यासोबतच घराबाहेर सीसीटीव्ही बसविल्यास सुरक्षिततेला बळकळी मिळण्यास मदत होणार आहे.




















