खासगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दाम्पत्याची २ कोटींची फसवणूक – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दाम्पत्याची २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी खासगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी इन्फिनाईट बेकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे संचालक नवनाथ अवताडे, अगस्त राहुल मिश्रा, राहुल श्यामराव काळोखे, सचिन लक्ष्मण खडतरे, चेतन धर, प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी, ययाती राहुल मिश्रा आणि गौरव देवीदास सुखदेवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीने कंपनीत गुंतवूणक केली होती. कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकीवर दरमहा सहा ते आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. तक्रारदाराला आरोपींनी एक ॲप मोबाइलमध्ये घेण्यास सांगितले. सुरुवातीला या ॲपच्या माध्यमातून गुंतवणुकीवर परतावा मिळाल्याचे भासविण्यात आले. तक्रारदाराने गुंतवणूक केलेली रक्कम आणि परतावा बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. आरोपीनी त्यांना मुद्दल, तसेच परतावा दिला नाही.
फसवणूक झाल्याचे तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. प्राथमिक तपासात संबंधित कंपनीच्या संचालकांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी पसार झाले असून, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मोरे तपास करत आहेत.




















