सायबर चोरट्यांकडून महिलेला गंडा
marathinews24.com
पुणे – Crime News : शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल ४० लाखांना ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २१ जानेवारी ते ३० मे कालावधीत येरवडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइल धारकासह खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नवले पुलाजवळ अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशी ठार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवड्यात राहायला असून, २१ जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्यांच्यासोबत संपर्क केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी सुरवातीला काही रक्कम महिलेच्या खात्यात वर्ग करण्यात आली. विश्वास संपादित झाल्यानंतर महिलेने गुंतवणूकीला सुरूवात केली. अवघ्या चार महिन्यांत तक्रारदार महिलेने तब्बल ४० लाख रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय ठाकूर तपास करीत आहेत.
शेअर ट्रेडींगचे जाळे अन लुट
Crime News : शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरटे नागरिकांना जाळ्यात अडकवत आहेत. प्रामुख्याने सुरूवातीला काही रक्कम खात्यात वर्ग करून विश्वास संपादित करीत आहेत. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत लाखो रूपये स्वतःच्या बँकखात्यात वळवून घेत संपर्क बंद करीत आहेत. त्यामुळे सायबर चोरट्यांचे चांगलेच फावले असून, सायबर पोलिसांकडून त्यांचा अटकाव करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांनो तुम्हालाही अशाप्रकारे परतावा देण्याचे फोन कॉल्स अथवा मेसेज येत असतीत तर, त्यापासून दूर राहा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.
वाघोलीतील एकाच इमारतीत तीन ठिकाणी घरफोडी
पुणे- Crime News : शहरानजीक असलेल्या वाघोली परिसरातील एकाच इमारतीत तीन ठिकाणचे फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३ लाख १५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ६ ते ९ जुलै कालावधीत बकोरी रोड फ्लोरिस्ता, राजेश्वरीनगरीत घडली आहे. याप्रकरणी विवेक मोहुर्ले (वय ३७ रा. बकोरी रोड, वाघोली ) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विवेक मोहुर्ले हे बकोरी रोड फ्लोरिस्ता इमारतीत राहायला आहेत.६ ते ९ जुलैला ते कामानिमित्त फ्लॅट बंद करून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून कपाटातील ४० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच त्यांच्या शेजारी राहणारे सुधीर होळे यांच्या घरातून चोरट्यांनी ३५ हजारांची रोकड चोरून नेली. गौतम भिंगानिया यांच्या घरातून सोन्या-चांदीचा ऐवज असा मिळून तिन्ही ठिकाणांहून चोरट्यांनी ३ लाख १५ हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक हवाळे तपास करीत आहेत.
उपनगरात घरफोडीचे सत्र कायम
शहरातील विविध भागात घरफोड्यांचे सत्र कायम असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरट्यांना पकडण्यात अपयश आल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने घर बंद करून बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या फ्लॅटमध्ये शिरून चोरी केली जात आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, सातत्याने घडणार्या घरफोडी रोखण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य देण्याची मागणी संबंधितांनी केली आहे.