वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ९ गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत नागरिकांना तब्बल २ कोटी ४३ लाख ८ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. बनावट सीबीआय अधिकारी बनून अटकेची भीती दाखविणे,सदनिकेचे आमिष, ई-मेल हॅकिंग, विमा, कर्ज, परदेशातील नोकरी, ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो ट्रेडिंगच्या माध्यमातून नऊ गुन्ह्यांत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे.सायबर फसवणूक पुणे प्रकरणी सायबर, खडक, कोथरूड आणि नऱ्हे पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वाधिक मोठी फसवणूक कॅम्प परिसरातील ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची झाली. बनावट सीबीआय अधिकारी बनून आरोपींनी त्यांच्या आधार क्रमांकाचा गैरवापर झाल्याचे सांगितले आणि अटकेची भीती दाखवत ५० लाख ५० हजार रुपये विविध खात्यांत जमा करून घेतले. सायबर फसवणूक पुणे प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
२०० कोटींच्या कर्जाचे आमिष; कंपनीला ९० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
घोरपडे पेठ व गुरुवार पेठ येथील सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन देत एका महिलेसह अन्य व्यक्तीकडून ५० लाख रुपये घेण्यात आले. मात्र सदनिका किंवा पैसे परत न दिल्याने साबीर हुसेन शेख, साकीरा शेख यांच्यासह सहा जणांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोथरूड येथील ६७ वर्षीय निवृत्त महिलेच्या बँक खात्याशी जोडलेला ई-मेल आयडी बदलून आरोपींनी ३३ लाख ३१ हजार ५५५ रुपये परस्पर इतर खात्यांत वळविले. या प्रकरणाचा तपास कोथरूड पोलिस करत आहेत. आंबेगाव बुद्रुक येथील एका तरुणाला विमा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून पॉलिसी अपडेटच्या बहाण्याने ३ लाख ९९ हजार ९९८ रुपयांचा गंडा घालण्यात आला. सायबर फसवणूक पुणे प्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कमी व्याजदरात कर्ज मंजूर झाल्याचे बनावट पत्र पाठवून प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली एका व्यक्तीकडून ५ लाख रुपये उकळण्यात आले. तर परदेशातील नामांकित कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाकडून २ लाख रुपये घेतल्यानंतर संपर्क तोडण्यात आला. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधितांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर घरबसल्या पार्टटाईम काम करून कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका तरुणाची ३ लाख ७७ हजार, तर एका तरुणीची ३ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
सुरुवातीला परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर गुंतविलेली रक्कम अडकविण्यात आली. याशिवाय, क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळेल, असे सांगून बनावट प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यास भाग पाडत एका व्यक्तीकडून १ लाख ९५ हजार रुपये उकळण्यात आले. या सर्व प्रकरणांमध्ये आरोपींनी मोबाईल कॉल, सोशल मीडिया, टेलिग्राम, व्हॉट्सअप, बनावट ई-मेल आणि संकेतस्थळांचा वापर करून नागरिकांना जाळ्यात ओढले. सायबर, खडक, कोथरूड आणि न्हेरे पोलिस बँक व्यवहार, मोबाईल क्रमांक, ई-मेल लॉग आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
‘ट्रेडिंग’च्या आमिषाचा सायबर सापळा; तब्बल २ कोटी २५ लाखांचा गंडा
कमी गुंतवणूक… भरघोस परतावा या आमिषाने सायबर चोरट्यांनी नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शेअर ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग, बनावट ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि व्हॉट्सअप गुंतवणूक गटांच्या माध्यमातून पाच वेगवेगळ्या प्रकरणांत तब्बल २ कोटी २५ लाख ९५ हजार २३५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या जाळ्यात एक ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि ७३ वर्षीय वृद्ध महिलेलाही अडकविण्यात आले आहे.
सायबर पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारींमध्ये आनंदनगर येथील एका व्यक्तीची ५२ लाख, येरवड्यातील ७३ वर्षीय महिलेची ५५.४३ लाख, दुसऱ्या एका गुंतवणूकदाराची ६८.४३ लाख, जे. एम. रस्त्यावरील ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली ४६.८७ लाख, तर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणखी एका व्यक्तीची ३.२१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणांत आरोपींनी बनावट ट्रेडिंग संकेतस्थळे, वेब लिंक्स, मोबाईल अँप, व्हॉट्सअप गट आणि सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींचा वापर करून नागरिकांना जाळ्यात ओढले. सुरुवातीला गुंतवणुकीवर नफा दिसत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न होताच आणखी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली किंवा संबंधितांचे संपर्कच बंद झाले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या सर्व प्रकरणांत सायबर पोलिसांनी मोबाईल क्रमांकधारक, व्हॉट्सअप खातेधारक, वेब लिंक तयार करणारे, विविध बँक खातेदार आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित बँक व्यवहार, डिजिटल पुरावे, आयपी अड्रेस, मोबाईल क्रमांक आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

























