लॉ कॉलेज रस्त्यावर धिंगाणा, ५ जण ताब्यात
marathinews24.com
पुणे – शहरातील वर्दळीच्या लॉ कॉलेज रस्त्यावर मध्यरात्री मद्यधुंद तरुणांनी कारमधून जीवघेणा स्टंट करून धिंगाणा घातला. भरधाव कारच्या मागील खिडक्यांमधून बाहेर येऊन हातात बियरच्या बाटल्या उंचावत आरडा ओरडा केला. याप्रकरणी ५ तरुणांना डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतले. स्वतःसह रस्त्यावरील इतर वाहन चालकांच्या जिवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी कारचा पाठलाग करून पाचही तरुणांना ताब्यात घेतले. कारचालक वेदांशू रणजितकुमार मंडल (२३ रा. कोरबा, छत्तीसगड), मनिष संजू परिहार (२४ रा. स्वारगेट, पुणे ), रोहन भरत औजी (२३ रा. कॅम्प, पुणे), सिद्धांत रामलू कंदूर (२२, रा. कोंढवा बुद्रुक) आणि रूपेश मनोहर पिल्ले (२३ रा. पद्मावती, पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी वापरलेली कार जप्त केली आहे.
डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई तुळशीराम भानुदास शेंडगे आणि पोलीस शिपाई महेर हे दि. १० ऑगस्टला मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास लॉ कॉलेज रोड परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी लॉ कॉलेजकडून नळस्टॉपच्या दिशेने सिल्व्हर रंगाची एलेंट्रा कार भरधाव वेगाने जाताना त्यांच्या निदर्शनास आली. कारच्या मागील दोन्ही खिडक्यांमधून तरुणांनी बाहेर येऊन हातात बियरच्या बाटल्या उंचावल्या. ते मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत असल्याचे दिसू आले. त्यांच्या हुल्लडबाजीनंतर पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. पोलिसांची चाहूल लागताच चालकाने नळस्टॉपच्या दिशेने कार आणखी वेगाने पळवली.
पोलिसांनी प्रसंगावधान राखत कारचा क्रमांक टिपून घेतला. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे कारचा आणि त्यातील तरुणांचा शोध घेण्यात आला. अखेर पाचही जणांना पोलिस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पाचही तरुणांनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कुलाळ करीत आहेत.





















