विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापे

पुणे, पिंपरीतून ६४५ लिटर गावठी दारू जप्त

marathinews24.com

पुणे – विषारी दारूचे प्याल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील १७ जणांचे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (स्टेट एक्ससाईज) शनिवारी छापे टाकले. या कारवाईत ६४५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून, गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकी – सविस्तर बातमी

विषारी दारू सेवन केल्याने १७ जणांचे मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग, पुणे कार्यालय, तसेच पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू केली. उत्पादन शुल्क विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात छापे टाकून ६४५ लिटर दारू जप्त केली. गावठी दारू प्रकरणात पोलिसांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून दहा जणांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार योगेश रामचंद्र वानखेडे (वय २३, रा. मुंढवा), राधेशाम हरिराम प्रजापती (वय ३५, रा. ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता), कर्नलसिंग तखतसिंह विरका (वय ७३), गुरुमंगतसिंह कर्नलसिंग विरका (वय ४५, दोघे रा. फुगेवाडी) यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली. दापोडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

या घटनेची गंभीर दखल घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागातील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तसेच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी विषारी दारू प्रकरणात अवैध धंद्यावर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा ठपका ठेऊन हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार,, उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

विषारी दारू प्रकरण उघडकीस आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी वेगवेगळ्या भागात छापे टाकले. रुग्णालयात जाऊन नातेवाईक, तसेच वैद्यकीय तज्ज्ञांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून ६४५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपींची चौकशी करण्यात आली.

हडपसरमधील पांढरे मळा परिसरात छापा टाकण्यात आला. आकाश जाधव याच्याकडून ७० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. दापोडीतील पवार वस्ती परिसरात छापा टाकून इरफान कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १५५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. पुण्यातील शिवाजीनगर भागातील वडारवाडी येथे छापा टाकून आर्यन धोत्रे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४२० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

उत्पादन शुल्क विभागाने ६४५ लिटर गावठी दारू जप्त केली आहे. गावठी दारू विक्री प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गावठी दारूत ‘मिथेनाॅल’ मिसळल्याचा संशय असून, गावठी दारूचे नमुने तपासणीसाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गावठी दारू विक्रीतून जादा फायदा व्हावा, तसेच दारू पिणााऱ्यांना नशा व्हावी, यासाठी मुख्य सूत्रधार योगेश वानखेडेने त्यात अत्यंत घातक असे ‘मिथेनॉल’ रसायन मिसळले, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वानखेडने मुंबईहून ऑनलाइन पद्धतीने ‘मिथेनाॅल’ मागविल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

वर्षभरात ६ हजार गुन्हे

‘उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारू विक्री प्रकरणात गेल्या वर्षी सहा हजार ६४२ गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींकडून २९ कोटी ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गावठी दारू विक्री प्रकरणात गेल्या वर्षी पाच दारू विक्रेत्यांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली आहे. त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन सखोल तपास करण्यात येत आहे. गावठी दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे’, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×