जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि जपानी भाषांचे २४० शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण
marathinews24.com
पुणे – जिल्हा परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या परकीय भाषा शिक्षण उपक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना परकीय भाषांचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील विविध भाषा व संस्कृतींची ओळख करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहात – सविस्तर बातमी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागामार्फत २१ सप्टेंबर २०२६ पासून पुणे जिल्हा परिषदेच्या २४० शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि जपानी या पाच परकीय भाषांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
पहिल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उपक्रमाचा लक्षणीय विस्तार करण्यात आला आहे. यावर्षी जर्मन भाषेसाठी १३२ शिक्षक, फ्रेंचसाठी २८ शिक्षक, स्पॅनिशसाठी २५ शिक्षक, रशियनसाठी २५ शिक्षक, तर जपानी भाषेसाठी ३० शिक्षक अशा एकूण २४० शिक्षकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी दोन परकीय भाषांसाठी १०२ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यंदा शिक्षकांची संख्या १०२ वरून २४०, तर परकीय भाषांची संख्या दोनवरून पाच करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत १८० तासांचा संरचित भाषा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये ऐकणे, वाचन, लेखन आणि बोलणे या चार प्रमुख भाषा-कौशल्यांवर विशेष भर दिला जातो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना संबंधित परकीय भाषेतील दैनंदिन संभाषण समजून घेणे व त्यात सहभागी होणे, साधे मजकूर वाचणे तसेच छोटे निबंध लिहिणे यांसारखी प्राथमिक कौशल्ये आत्मसात करता येतील.
हा उपक्रम ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ (Training of Trainers) या संकल्पनेवर आधारित आहे. प्रशिक्षण घेतलेले शिक्षक आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संबंधित परकीय भाषा आणि संस्कृतीची प्राथमिक ओळख करून देतील. पहिल्या वर्षी प्रशिक्षण घेतलेल्या १०२ शिक्षकांनी प्रत्येकी सुमारे ५० विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचविल्याने अंदाजे ५ हजार १०० विद्यार्थ्यांना परकीय भाषा व संस्कृतीची ओळख झाली आहे.
परकीय भाषा शिकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक जाणिवेला, संवादकौशल्याला आणि विविध संस्कृती समजून घेण्याच्या क्षमतेला चालना मिळण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या परिसराच्या पलीकडील भाषा, संस्कृती आणि विविध जागतिक संदर्भांशी परिचित होण्याची संधी मिळते.
पुणे जिल्हा परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा सातत्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद शाळांमधील भाषा शिक्षणाचा विस्तार करण्यासोबतच विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख आणि व्यापक जागतिक दृष्टिकोन असलेल्या शिक्षणव्यवस्थेशी जोडण्याच्या प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण भाग आहे.






















