घरफोड्यांचे सत्र कायम; विश्रांतवाडी, येरवडा आणि वाघोली परिसरात लाखोंची चोरी
marathinews24.com
पुणे – शहरातील वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. टिंगरेनगर, आव्हाळवाडी, गणेशनगर तसेच बीडीकामगार वसाहत या भागात या घटना घडल्या असून, जवळपास ८ लाखाहून अधिक ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू – सविस्तर बातमी
विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अक्षय सावंत (वय ४१) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार गुरूवारी (दि. ६) सकाळी उघडकीस आला आहे. तक्रारदार हे टिंगरेनगरमधील येथील एन्क्लेव्ह सोसायटीत राहण्यास आहेत. ते बुधवारी सायंकाळी कुटूंबासह बाहेर गेले होते. त्यांचे इमारतीमधीलच रहिवाशी कपिल ठाकूर यांचा देखील फ्लॅट बंद होता. यादरम्यान, चोरट्यांनी दोन्ही घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून ६ लाख ६९ हजार ८३१ रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तक्रारदार गुरूवारी सकाळी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लोहकरे हे करत आहेत.
येरवडा येथील बीडीकामगार वसाहतीतील बंद घर चोरट्यांनी भरदिवसा फोडून ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत ४८ वर्षीय महिलेने लक्ष्मीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. बुधवारी सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ही घरफोडी झाली आहे. तर, याच भागातील आणखी एक बंद घर फोडून चोरट्यांनी ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. याबाबत २९ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.
वाघोलीत दोन मोबाईल शॉपी फोडल्या
चोरट्यांकडून बंद घरांसोबतच मोबाईल शॉपी देखील टार्गेटवर असल्याचे सातत्याने दिसत आहे. वाघोली येथील आव्हाळवाडी भागातील दोन बंद मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडल्या असून, दोन्ही शॉपीमधून २८ हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे. सुदैवाने या मोबाईल शॉपीमधून महागडे मोबाईल चोरट्यांच्या हाती लागलेले नाहीत. याप्रकरणी वाघोली पोलिसांत अज्ञातांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

























