पुणे-सातारा रस्ता, बाणेर, अहिल्यानगर रस्ता, खराडी परिसरात अपघाताच्या घटना
marathinews24.com
पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातांत चैाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे-सातारा रस्ता, बाणेर, अहिल्यानगर रस्ता, खराडी परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरुन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक चंद्रकांत पांगारे (वय ५९, रा. शिवगोरक्ष अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्यांचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार एस. पी. लोहार यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून; वाघोलीतील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दीपक पांगारे हे पुणे-सातारा रस्त्यावरील राव हाॅस्पिटलसमोरुन निघाले होते. दुचाकी घसरुन ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. २ फेब्रुवारी रोजी अपघाताची घटना घडली होती. अपघाताची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास केला. भरधाव दुचाकी घसरल्याने अपघात झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर या प्रकरणात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक केंद्रे तपास करत आहेत.
वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून पडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर फाटा परिसरात घडली. हरिदास भाऊसाहेब जगताप (वय ६२, रा. ढोर आळी, शिरुर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप यांचा मुलगा शुभम (वय २६) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरिदास जगताप हे शिरुरमधील वीटभट्टीवर काम करत होते. १४ जानेवारी रोजी बाणेर परिसरात विटा घेऊन ट्रक आला होता. जगताप हे ट्रकमधील भरलेल्या विटांवर बसले होते. बाणेर फाटा परिसरात विटांच्या थप्पीवरुन ते रस्त्यावर पडले. अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षा प्रवासी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद परिसरात घडली. अपघातात रिक्षातील आणखी एक प्रवासी जखमी झाला. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अलका भरत वाघेला (वय ६३) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातात भरत वाघेला जखमी झाले. याबाबत सारिक अजय जाधव (वय ४२, रा. चैाफुला चौक, कोलवडी-केसनंद रस्ता, ता. हवेली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू अलका आणि भरत वाघेला हे रिक्षातून फिर्यादी जाधव यांच्याकडे निघाले होते. सोमवारी (१ जून) दुपारी साडेबाराच्या समुारास कोलवडी-केसनंद रस्त्यावर भरधाव ट्रकने रिक्षाला धड दिली. ट्रकच्या धडकेत अलका आणि भरत वाघेला हे रिक्षातून बाहेर फेकले गेले. ट्रकच्या चाकाखाली सापडून अलका यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात भरत गंभीर जखमी झाले. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.
मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात रविवारी (३१ मे) रात्री घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात तीन वर्षांच्या बालकासह महिला गंभीर जखमी झाले. पवन पांडुरंग भारंबे (वय ३५, रा. साई सत्यम पार्क, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात भारंबे यांच्या नातेवाईक प्रिया तुषार कोल्हे (वय ३२), त्यांचा तीन वर्षांचा मुलगा दीपराज हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मोटार चालक प्रसाद शिवाजी मोरे (वय २५, रा. रायसोनी काॅलेजजवळ, वाघोली) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी अमोल जाधव यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार पवन भारंबे, प्रिया कोल्हे आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा दीपराज हे रविवारी खराडी भागातून रात्री साडेदहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार पवन यांचा जागीच मृ्त्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालाकाला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.






















