आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पोलिसांकडे तक्रार दिल्याने एकाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना कर्वे रस्त्यावर घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कृष्णा रामचंद्र ढगे (वय ३१, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभम गोफणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मोक्का’ कारवाईनंतर पसार सराईत छत्रपती संभाजीनगरमधून अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, ढगे हे चालक आहेत. आराेपी त्यांच्या ओळखीचा आहे. आरोपीशी त्यांचा वाद झाला होता. ढगे यांनी आरोपीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रार दिल्याने आरोपी त्यांच्यावर चिडला होता. १५ जून रोजी ढगे आणि त्यांचा मित्र कर्वे रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी आरोपीने त्यांना अडविले. शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने रस्त्यात पडलेला दगड ढगे यांच्या डोक्यात घातला. ढगे गंभीर जखमी झाले. पसार झालेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार संतोष कदम तपास करत आहेत.
सोसायटीत दुचाकी लावण्यावरुन हाणामारी
सोसायटीत दुचाकी लावण्यावरुन झालेल्या वादातून एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. या प्रकरणी चार ते पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत किरण प्रकाश निम्हण (वय ३६, रा. उत्सव रेसीडन्सी, धायरी, सिंहगड रस्ता) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या आवारात बेशिस्तपणे दुचाकी लावल्याने निम्हण यांनी सोसायटीच्या समुहावर (ग्रुप) छायाचित्रे टाकली होती. या कारणावरुन आरोपी त्यांच्यावर चिडले होते. सोसायटीत राहणारे तीन ते चार जण निम्हण यांच्या सदनिकेत शिरले. त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी निम्हण यांच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींबरोबर असलेल्या एका महिलेने निम्हण यांच्या आईला धक्का दिल्याने त्या पडल्या. निम्हण यांच्या आईला महिलेने मारहाण केली. पोलीस हवालदार वावरे तपास करत आहेत.























