चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Market Yard Pune Theft : मार्केट यार्डातील भुसार बाजारात सुकामेव्याच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाखांची रोकड, चांदीचे नाणे असा ६ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.याबाबत भुसार बाजारातील व्यापारी शुभम विनोद जैन (वय २७, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी मार्केट यार्ड पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईत आर्थिक वादातून तरुणावर गोळीबार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्डातील भुसार बाजारात जैन यांचे सुकामेव्याचे दुकान आहे. शनिवारी (२४ ऑक्टोबर) मध्यरात्री चोरट्यांनी दुकानातील लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील पहिल्या मजल्यावरील खिडकीची जाळी तोडली. दुकानातील गल्ल्यात ठेवलेली सहा लाखांची रोकड आणि चांदीचे नाणे असा ऐवज लांबविला. दुकानात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. (Market Yard Pune Theft) या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी भुसार बाजारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, हवालदार डोळसे तपास करत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भुसार बाजारातील दुकानात चोरी झाल्याने व्यापारी वर्गात घबराट उडाली. दिवाळीत मार्केट यार्डात मोठी उलाढाल होती, तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील खरेदीदार गर्दी करतात. दिवाळी खरेदीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे.
स्वारगेट परिसरात प्रवाशाचा मोबाइल हिसकावला
स्वारगेट परिसरात प्रवाशाचा महागडा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत संग्राम व्यंकटराव शिंदे (वय ४५, रा. आलयम अपार्टमेंट, इचलकरंजी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे कामानिमित्त शनिवारी (२४ ऑक्टोबर) पुण्यात आले होते. पहाटे पावणेचारच्या सुमारास ते स्वारगेट मेट्रो स्थानकाजवळ थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील ७५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. शिंदे यांनी आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.




















