पुण्यातून तीन आरोपी ताब्यात
marathinews24.com
पुणे – Navi Mumbai Firing Case : आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून एकावर नवी मुंबईतील तळोजा परिसरात गोळीबार करुन पसार झालेल्या तीन जणांना पोलिसांना पकडले. कात्रजमधील आंबेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींना तपासासाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रुद्र दादासाहेब बारवकर (वय १९, रा. संतोषनगर, कात्रज), अनिकेत प्रताप नरवडे (वय १९, रा. खंडाळे, रांजणगाव, ता. शिरूर) आणि सौरभ गोरख चौधरी (वय २४, रा. संतोषनगर, कात्रज) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अल्पवयीनावर तीक्ष्ण शस्त्राने वार करणारे अटकेत – सविस्तर बातमी
नवी मुंबईतील तळोजा फेज दोन परिसरातील शिवाजी चौकाजवळ असलेल्या मारवा सोसायटी परिसरात शनिवारी (२४ ऑक्टोबर) मध्यरात्री एकच्या सुमारास आर्थिक व्यवहारातून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Navi Mumbai Firing Case) गोळीबार करुन पसार झालेल्या आराेपींचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची पथके रवाना झाली. गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी कात्रज भागातील दत्तनगर परिसरात असल्याची माहिती आंबेगाव पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस कर्मचारी धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले.
त्यानंतर तिघांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, डाॅ. सागर कवडे, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गु्न्हे शाखेचे निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलीस कर्मचारी चेतन गोरे, हनुमंत मासाळ, हरिष गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे यांनी ही कारवाई केली.




















