पुणे जिल्हा कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध
marathinews24.com
पुणे – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, पुणे जिल्हाध्यक्षपदी मारुती रामभाऊ शिंदे, तर सरचिटणीसपदी पै. महेश घुले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच मध्यवर्ती इमारत येथे बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र दशरथ अभंगराव यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा केली.
समितीमध्ये घडणारी युवाशक्ती भारताच्या प्रगतीमध्ये योगदान देईल – सविस्तर बातमी
संघटनेच्या प्रत्येक पदासाठी एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडले गेले. कार्याध्यक्षपदी दीपक चव्हाण, कोषाध्यक्षपदी विजय लांघे, कार्यालयीन सचिवपदी सोमनाथ जाधव, सहकोषाध्यक्षपदी अविनाश तळेकर, तर संघटकपदी भाग्यशाली लोखंडे व एस. व्ही. सानप यांची निवड झाली. प्रसिद्धी प्रमुखपदी प्रशांत आवळे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी दिनेश कुचेकर, कृष्णा साळवी, नंदकिशोर भरेकर, सदानंद मोरडे, संजय कडाळे, बाळासाहेब चौधरी, संध्याताई काजळे, सुनील चोरामले, दीपक धीवार, विष्णू माने, प्रशांत पवार, ज्ञानेश्वर कापसे, शंकर शिंदे, प्रवीण इगवे, अरुण काळे, मनोहर परमार, बसवराज कलागदी, नसरुद्दीन शेख आणि प्रज्ञा गायकवाड, तर सहसचिवपदी अनिकेत साळुंखे, राजेंद्र ढवळे, सिद्धेश्वर गोवेकर, सोपान भोसले, रवींद्र मुळे, विजय नरोटे, वैभव चव्हाण, ज्ञानेश्वर शिरसागर, राजेंद्र चव्हाण व विद्या जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘आरएनपीएस’ पेन्शन योजना प्रभावीपणे लागू करावी, सर्व विभागांतील रिक्त पदे सरळसेवेने तातडीने भरावीत, शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सरळसेवेने भरती करावी, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती तातडीने द्यावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अनुकंपा भरती १०० टक्के एकाचवेळी करावी, कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी, महागाई भत्ता केंद्राप्रमाणे वेळेवर व त्रुटीविरहित लागू करावा, बालसंगोपन रजा दोन वर्षांची करावी, विविध विभागांचे आकृतिबंध व सेवा प्रवेश नियम तातडीने मंजूर करावेत, या व कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबत शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.
“नवनिर्वाचित कार्यकारिणी पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळून मार्गी लावेल, अशी अपेक्षा आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो,” असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विश्वास काटकर यांनी सांगितले.





















