वानवडी पोलिसांकडून पाच जण अटकेत
marathinews24.com
पुणे – Online Fraud : सायबर फसवणुकीसाठी बनावट बँक खात्याचा (म्यूल अकाऊंट) वापर करणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली. या टोळीने देशभरातील १९ जणांची १ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मुख्य सूत्रधाराने फसवणुकीतील रक्कम बनावट खात्यात जमा करण्यासाठी टोळीतील अन्य साथीदारांना पैसे दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटकेची भीती दाखवून महिलेची १८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
श्रवण राजेंद्र अंकुशे (वय २५, रा. उरळी देवाची, पुणे-सासवड रस्ता), हरिओम हरिराम साहू (वय २४, रा. सिद्धार्थनगर, साळुंके विहार, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) सौद इदफान शेख (वय २३), साहिल रौफ शेख (वय २५, दोघे रा. जयजवाननगर, येरवडा), तालीब नूरमोहम्मद शेख (वय २५, रा. मोहनवाडी, येरवडा) यांना अटक करण्यात आली. Online Fraud महाराष्ट्र सायबर विभागाकडे सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी बनावट खात्यांचा वापर झाल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी सायबर विभागाने वानवडी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. सायबर गुन्ह्यात देशभरातील १९ जणांची फसवणूक झाली हाेती. फसवणुकीतील रक्कम पुण्यातील पाच आरोपींच्या खात्यात जमा झाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला.
श्रवण अंकुशे हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळाली होती. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती काढली होती. अंकुशे याने त्याचा साथीदार साहू याच्यामार्फत साथीदार सौद शेख, साहिल शेख, तालीब शेख यांना बनावट बँक खाते काढण्यास सांगितले होते. सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम बनावट खात्यात जमा झाल्यानंतर फसवणुकीच्या प्रत्येक व्यवहारांमागे पाच हजार रुपये देण्यात येईल, असे आरोपी अंकुशे, साहू यांनी शेख यांना सांगितले होते. अंकुशे याने या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यातील रक्कम जमा करून घेण्यासाठी केला होता.
Online Fraud देशभरातील १९ जणांची एक काेटी ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली हाेती. सायबर फसवणुकीतील रक्कम अंकुशे याने साथीदारांच्या बनावट खात्यात जमा करून घेतली होती. या प्रकरणी अंकुशे याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, उपनिरीक्षक शेखर मोकाटे, समाधान उगले, गणेश आगम, अमोल पिलाणे, प्रमोद टिळेकर, विनाेद शिवले, दया शेगर, आशिष कांबळे, दीपक क्षीरसागर, चैत्राली यादव, रुपाली दिवटे यांनी ही कारवाई केली.























