३१ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांच्या स्वाधीन
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागांत हरवलेल्या मोबाइल फोनच्या तक्रारींचा माग काढत पुणे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तब्बल १४८ मोबाइल फोन शोधून काढले. सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून ट्रेस करण्यात आलेल्या या मोबाइलची अंदाजे किंमत ३१ लाख रुपये असून, हे मोबाइल सोमवारी (दि. १०) संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या वतीने ही विशेष मोहीम राबवण्यात आली.
पाय लागल्याने केला तरूणाचा खून – सविस्तर बातमी
शहरातील विविध ठिकाणी मोबाइल हरवल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने सीईआयआर पोर्टलवरून मोबाइलची माहिती तपासण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे १४८ मोबाइल हस्तगत केले. मोबाइल परत मिळाल्यानंतर अनेक तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आभार मानत पुणे पोलिसांच्या कामाचे कौतुक केले.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या अधिपत्याखाली सीईआयआर पोर्टल पाहणारे पोलिस अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट १ ते ७ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून ही कामगिरी केली.





















