पुण्यातील गणेश पेठेतील घटना
marathinews24.com
पुणे – वडापाव खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर पायाला धक्का लागल्याच्या शुल्लक कारणामुळे तरूणाचा खून केल्याची घटना गणेश पेठेत घडली आहे. डुल्या मारूती चौक परिसरात रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घटना घडली. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वैभव किशोर साळुंखे ( वय २४, रा. गणेश पेठ) याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम आणि वैभव दे दोघे गणेश पेठ परिसरात राहण्यास असून दोघांची तोंड ओळख आहे. वैभव हा बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरीस आहे. दोघांचेही वडील रिक्षा चालक आहेत. रविवारी (दि.९) दुपारी गणेश पेठेतील वडापावच्या गाडीवर दोघांचा एकमेकाला पाय लागल्याने त्यांच्यात वाद झाले. त्यातून वादाचे पर्यवसन मारहाणीत झाले. वैभवने शिवमच्या छातीत जोरात बुक्या मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर शिवम घरी जाऊन झोपला होता. रात्री उशीरापर्यंत तो उठत नाही हे लक्षात आल्यावर घरच्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही.
शेवटी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी समोर आले. हा प्रकार फरसखाना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता तसेच नागरिक व त्यांच्या वादाची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने भांडणे झाल्याचे सांगितले. पुढील तपास फरासखाना पोलिस करत आहेत.





















