परदेशी तरुणीसह तिघी ताब्यात; दलालांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – शहरातील शिवाजीनगर भागातील हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रयाचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून परदेशी तरुणीसह तिघींना ताब्यात घेतले. तरुणींना देहविक्रयास प्रवृत्त केल्याप्रकरणी दाेन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यात सराईतांकडून ३ पिस्तूलांसह काडतुसे जप्त – सविस्तर बातमी
शिवाजीनगरमधील एसटी स्थानक परिसरात एका हाॅटेलमध्ये देहविक्रयाचा प्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध विभागाला (एएचटीयू युनिट) मिळाली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून परराज्यातील तरुणीला ताब्यात घेतले.
सेनापती बापट रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये परदेशी तरुणीसह दोघींना दलालांनी आणल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सेनापती बापट रस्त्यावरील हाॅटेलमध्ये छापा टाकून परदेशी तरुणीसह दोघींना ताब्यात घेतले. याप्रकरणी दलालांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, ईश्वर आंधळे, तुषार भिवररकर, अमेय रसाळ, अविनाश शिंदे, जाधव, तसेच पोलीस महिला पोलीस कर्मचारी खेडेकर, इंगळे, रेश्मा कंक यांनी ही कारवाई केली.
आराम बस चालकाला जिवे मारण्याची धमकी
प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस चालकाला शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना संगमवाडी भागात घडली. या प्रकरणी एका रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बस चालक मिथुन दिलीप वाघमारे (वय ३५, रा. खुळेवाडी, चंदननगर) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून राेजी दुपारी संगमवाडीतील प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस थांब्यावर रिक्षाचालकाने रिक्षा लावली होती. रिक्षामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने बस चालक वाघमारे याने रिक्षाचालकाला रिक्षा काढण्यास सांगितले. या कारणावरुन रिक्षा चालकाने आराम बस चालक वाघमारे यांना शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस हवालदार माने तपास करत आहेत.




















