नांदेड फाटा आणि येरवड्यात अपघात
marathinews24.com
पुणे – Pune Accident News : शहरात वेगवेगळ्या अपघातांत अल्पवयीनासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा, तसेच येरवडा परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार अल्पवयीनाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. प्रथमेश राजू लोखंडे (वय १७, रा. कृष्णकुंज सोसायटी, गोकुळनगर, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या अल्पवयीनाचे नाव आहे. बेबी राजू लोखंडे (वय ३९) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात दांडिया कार्यक्रमानंतर माराहाणीच्या घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्रथमेश हा १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास सिंहगड रस्ता भागातील नांदेड फाट्याहून खडकवासलाकडे निघाला होता. त्या वेळी भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार प्रथमेश हा एका डंपरच्या पाठीमागील बाजूवर आदळला. दुचाकी घसरल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक कसबे तपास करत आहेत.
येरवड्यातील विमानतळ रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. (Pune Accident News ) केवीन विनायक राऊत (वय २७, रा. शिवालिक रेसीडन्सी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत केवीनचे काका अनिल (वय ५७, रा. महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, येरवडा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार केवीन १७ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास येरवडा परिसरातून टिंगरेनगरकडे निघाला होता. विमानतळ रस्त्यावरील ५०९ चौकाजवळ भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला असून, पोलीस हवालदार माळी तपास करत आहेत.




















