धनकवडीत तरुणाला गजाने मारहाण; बालेवाडीत जुन्या वादातून डोक्यात दगड घातल्याचा आरोप
marathinews24.com
पुणे – Pune Dandiya Fight Cases : दांडिया कार्यक्रमानंतर झालेल्या वादातून मारहाणीच्या घटना बाणेर आणि धनकवडी भागात घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी सहकारनगर आणि बाणेर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. धनकवडीतील श्रीधरनगर भागात सोसायटीच्या आवारात तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना १७ ऑक्टोबरला रात्री घडली. याबाबत अनिकेत मोरेश्वर तावरे (वय ३१, रा. श्रीनगर पार्वती हाईट्स, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी प्रकाश कोकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर चोरट्यांकडून निवृत्त प्राचार्यांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सोसायटीतील दांडिया कार्यक्रमानंतर रात्री दहाच्या सुमारास मित्रांबरोबर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी हा दारू पिऊन सोसायटीत आला. त्याने सोसायटीच्या आवारात शिवीगाळ केली. (Pune Dandiya Fight Cases) तक्रारदार तरुणाला गजाने मारहाण केली, तसेच सिमेंटचा गट्टू फेकून मारला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
बालेवाडीतील साई चौकात एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत सुमीत राजू राठोड (वय २०, रा. पाटीलनगर, बालेवाडी) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी किरण सोनवणे याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री राठोड आणि त्यांची बहीण बालेवाडीतील साई चौकात दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. त्या वेळी आरोपींनी जुन्या वादातून राठोड याला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातला. पोलीस हवालदार सकट तपास करत आहेत.




















