मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गु्न्हा
marathinews24.com
Pune : हाॅटलमधील सूपमध्ये झुरळ सापडले – हाॅटेलमध्ये कुटुंबासह जेवण करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. वानवडी भागातील एका हाॅटेलमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून संबंधित हाॅटेलचे मालक, तसेच व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्विनी रवी शिससाट (वय ३१, रा. दापोडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भिवंडी दरबार हाॅटेलचे व्यवस्थापक अमन हुसेन शेख (वय २४, रा. आझादनगर, भिवंडी) याच्यासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थिनींचा छळ म्हणजे संवेदनहिनतेचं भयंकर उदाहरण- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसाट कुटुंबीय हे गेल्या महिन्यात १६ जून रोजी वानवडीतील भिवंडी दरबार हाॅटेलमध्ये रात्री जेवण करण्यासाठी गेले होते. त्यंनी जेवण मागविले. जेवण सुरू करण्यापूर्वी त्यांना सूप देण्यात आले. तेव्हा शिरसाट यांना दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळले. घटनेनंतर शिरसाट यांनी हाॅटेल व्यवस्थापकासह कामगारांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी सारवासारव केली.
हाॅटेल व्यवस्थापकाने भटारखान्यातील स्वच्छतेची कोणतीही दक्षता घेतली नाही, तसेच ग्राहकांच्या आरोग्याला हानी होईल, असे खाद्यपदार्थ दिल्याचे शिसराट यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २७५ अन्वये (ग्राहकांना भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कुंभार तपास करत आहेत.
मद्य विक्री दुकानातून रोकड चोरी – चोरट्याकडून मद्याच्या बाटल्यांची तोडफोड
Pune – मद्य विक्री करणाऱ्या दुकानातील दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील १५ हजारांची रोकड लांबविल्याची घटना कल्याणीनगर भागात घडली. चोरट्यांनी मद्याच्या बाटल्या फोडल्याचे उघडकीस आले. सचिन अंगदराव मुसळे (वय ३१, रा. आदर्शनगर ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील कल्याणीनगर भागात प्रकाश वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील १५ हजारांची रोकड लांबविली, तसेच चोरट्याने दुकानातील मद्याच्या बाटल्या फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांंनी मद्य विक्री दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार तपास करत आहेत. दरम्यान शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बंद सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी गेल्या साडेतीन वर्षांत तब्बल ७३ कोटी ४० लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले आहे. घरफोडीच्या दाखल गुन्ह्यांच्या प्रमाणात गुन्हे उघड होण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.
बारमधून मद्याच्या बाटल्या चोरी
Pune – मांजरी रस्त्यावरील रेस्टोरंट बारमधील दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्याने ३३ हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्या, रोकड, तसेच मोबाइल लाबंविल्याची घटना घडली. याबाबत लक्ष्मणसिंग चत्तरसिंग तनवर (वय ३६, रा. मांजरी रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी रस्त्यावर नाईकल रेस्टाॅरंट बार आहे. चोरट्यांनी ९ जुलै रोजी मध्यरात्री बारच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. बारमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्याने गल्ल्यातील रोकड लांबविली, तसेच ३३ हजार रुपयांच्या विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या लांबवून चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.