गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी, चार मोबाइल आणि तीन लॅपटॉप चोरी
marathinews24.com
पुणे – Pune Crime : पीएमपी प्रवासी महिलेच्या हातातील ७० हजारांची सोन्याची बांगडी चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; अडीच कोटींचा गंडा, ९ गुन्हे दाखल – सविस्तर बातमी
तक्रारदार ६२ वर्षीय महिला विश्रांतवाडी परिसरात राहायला आहेत. त्या शिवाजीनगर ते डेक्कन जिमखाना या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. प्रवासादरम्यान चोरट्यांनी कटरचा वापर करुन ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कापून नेली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
स्वारगेट एसटी स्थानकात चौघांचे मोबाइल लंपास
स्वारगेट एसटी स्थानकात चौघा प्रवाशांचे मोबाइल संच चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार २२ वर्षीय तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे. ते शनिवारी (१८ जुलै) दुपारी चारच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात आले. एसटी स्थानकाच्या आवारातील नाथ जल केंद्रातून ते पाण्याची बाटली खरेदी करत होते. तक्रारदार तरुण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी प्रवासी बॅगेत मोबाइल संच ठेवले होते. चोरट्याने प्रवासी बॅगेत ठेवलेले चार मोबाइल लांबविले. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
लॅपटाॅप, पारपत्र चोरीला
सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागातील एका सदनिकेत शिरुन चोरट्यांनी तीन लॅपटाॅप आणि पारपत्र लांबविले. याबाबत एका तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि त्याचे मित्र वडगाव बुद्रुकमधील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात भाडेतत्त्वार सदनिका घेऊन राहत आहेत. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी सदनिकेतून तीन लॅपटाॅप, तसेच तक्रारदार तरुणाचे पारपत्र लांबविले. पोलीस हवालदार केकाण तपास करत आहेत.























