आगीच्या घटना टाळण्यासाठी फायर ब्रिगेडकडून मोहिम
marathinews24.com
पुणे – Pune Diwali Fire Safety : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे अग्निशामक दलाने कंबर कसली असून, आतापासून नागरिकांमध्ये जनजागृती प्राधान्य दिले आहे. विशेषतः सुरक्षित दिवाळीसाठी पुणेकरांवर अग्निसुरक्षेची जबबादारी टाकण्यात आली आहे. फटाक्यांमुळे लागणार्या आगीच्या घटना रोखण्याच्या अनुषंगाने फायर बिग्रेडने मोहिम हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने सर्व अधिकार्यांसह जवानांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. संबंधित लोक नागरिकांच्या सेवेसाठी काम करणार असून, पुणेकरांनी अग्निशमक दलाच्या आवाहनाला दाद देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘माॅक ड्रिल’ – सविस्तर बातमी
सुरक्षित दिवाळी अन अग्निसुरक्षेची जबाबदारीच्या मोहिमेद्वारे आगीच्या घटनांवर आळा घालण्यात येणार आहे. दिवाळीत पुणे शहर, तसेच उपनगरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात येते. ठिकठिकाणी झालेल्या आतषबाजीमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. प्रामुख्याने इमारती, सोसायटीच्या छतावर साचलेला पालापाचोळा पेट घेतो, तसेच झाडांना आगी लागतात. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी पुणेकरांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन अग्निशमक दलाने केले आहे. (Pune Diwali Fire Safety) विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात सर्वाधिक फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे आगीच्या घटना घडतात. त्यामुळे अनेक गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यापार्श्वभूमीवर दलाने नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. फटाके वाजविताना काळजी घेतल्यास गंभीर घटना टाळता येऊ शकतात, या विचाराने अग्निशमन दलाचे प्रमुख गणेश सोनुने यांच्या संकल्पनेतून यंदा जनजागृती मोहिमेला गती देण्यात आली आहे.
ऐन सण-उत्सवात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अग्निशमन दलाचे अधिकार्यासह जवानांनी खबरदारी घेतली आहे. फटाक्यांचे स्टॉल उभारणीच्या ठिकाणी राबविण्यात येणारी सुरक्षितता, घेतली जाणारी दक्षता ते आताषबाजीमुळे लागणार्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेले नियोजन महत्वाचे ठरणार आहे. त्यासोबतच काही दिवसातच डेक्कन नदीपात्र सह अनेक ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल उभारले जाणार आहे. त्यामुळे त्याठिकाणची सुरक्षितता घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले जाणार आहे. दरम्यान, आगामी सण-उत्सवात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमक दलात कार्यरत असणार्या सर्व अधिकारी, जवानांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. संबंधित सर्वजण ड्युटीवर हजर राहून नागरिकांची काळजी घेण्यास प्राधान्य देणार आहेत.
अग्निसुरक्षेची अशी घ्यावी लागणार जबाबदारी
फटाक्यामुळे आग लागू नये म्हणून नागरिकांनी शक्यतो मोकळ्या मैदानाचा वापर करावा. अरुंद गल्ल्या मध्ये फटाके वाजवू नये. ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे. फटाके उडवताना सैलसर अथवा नायलॉनचे कपडे टाळावेत. उत्साहाच्या भरात हातात फटाके घेउन फोडणे, इतरांच्या अंगावर फटाके टाकणे, वाहनांजवळ फटाके फोडण्याचा प्रयत्न करू नये. विशेषतः कचर्याचे ढीग, इलेक्ट्रॉनिक डीपी जवळ फटाके फोडणे कटाक्षाने टाळण्याचे आवाहन पुणे अग्निशमक दलाने केले आहे. दरम्यान, आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे जवान सज्ज आहेत. मुख्य अग्निशमन केंद्रासह शहर, तसेच उपनगरातील अग्निशमन केंद्रातील जवान तातडीने घटनास्थळी रवाना होऊन आग आटोक्यात आणतील. नागरिकांनी सूचनांचे पालन केल्यास दिवाळीत सुरक्षित, आनंददायी साजरी होईल असा विश्वास अग्निशमक दलाने व्यक्त केला आहे.
पुण्यात दिवाळीतील आगीच्या घटना
वर्ष आगीच्या घटना
२०२१ – २१
२०२२ – १९
२०२३ – ३५
२०२४ – ६०
२०२५ – ४३
अग्निशमक दल व आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक
दिवाळीत अग्निशमन दलाचे दूरध्वनी क्रमांक व्यस्त असतात. आग लागण्याची घटना, तसेच आपत्कालिन परिस्थितीत तातडीने अग्निशमन दल नियंत्रण कक्ष (दूरध्वनी -१०१, ०२०-२६४५१७०७, मोबाइल-९६८९९३५५५८) या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५०१२६९, ०२०-२५५०६८००) यावर संपर्क करण्याचे आवाहन पुणे अग्निशमक दलाने केले आहे.




















