अस्वच्छतेसह गंभीर त्रुटी उघड, परवाने निलंबित होण्याची शक्यता
marathinews24.com
पुणे – शहरातील खाद्य सुरक्षेच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन (एफडीए), पुणे यांनी १७ जुलै २०२७ रोजी रात्री उशिरापर्यंत बालेवाडी, पुणे स्टेशन परिसरातील मिल्स, कॅम्प, कल्याणीनगर आणि नगर रोड परिसरातील विविध पब्स, हॉटेल्स व खाद्य आस्थापनांमध्ये तपासणी मोहीम राबविली. या तपासणीत काही आस्थापनांमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे, तसेच अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे महापालिका भरती घोटाळा; बनावट नियुक्तीपत्रांच्या नावाखाली ४५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचे समजते. या प्रकरणांमध्ये संबंधित आस्थापनांविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, गंभीर त्रुटी आढळलेल्या आस्थापनांचे
परवाने निलंबित करण्यात येऊ शकतात.
शहरातील पब्स आणि हॉटेल्समध्ये वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अशा अचानक तपासण्या सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते उमेश जगताप यांनी यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय गांभीर्याने हाताळण्याची गरज असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीचा अधिकृत अहवाल आणि संबंधित आस्थापनांवर करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
“पुण्यातील काही पब्स आणि हॉटेल्समध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित गंभीर अनियमितता आढळून आल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेली कारवाई स्वागतार्ह असून, ज्या आस्थापनांनी नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करून आवश्यक असल्यास त्यांचे परवाने निलंबित करावेत. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. अशा तपासण्या नियमितपणे व्हाव्यात, हीच अपेक्षा आहे.”
– उमेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते



















