तीन विधीसंघर्षित बालकांची कर्मचाऱ्यांशी झटापट
marathinews24.com
पुणे – बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार निरीक्षणगृहात दाखल करण्यासाठी नेण्यात येत असलेल्या तीन विधीसंघर्षित बालकांनी कर्मचाऱ्यांशी झटापट करून पलायन केल्याची धक्कादायक घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली. निवारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेरच झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत दोन बालकांना ताब्यात घेतले असून, तिसऱ्याचा अद्याप शोध सुरू आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली असून, १७ जुलै रोजी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
बिल कमी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर डॉक्टरानेच रोखले पिस्तूल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल कल्याण समिती क्रमांक २ यांच्या आदेशानुसार तीन १७ वर्षीय विधीसंघर्षित बालकांना शासकीय बारामती येथील निरीक्षणगृह बालगृह येथे दाखल करण्यासाठी नेण्यात आले होते. त्यासाठी खासगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, बारामती येथील संबंधित संस्थेने या बालकांना स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर तिन्ही बालकांना पुन्हा पुण्यातील ‘साथी खुले निवारागृह’ येथे आणण्यात आले. निवारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनातून खाली उतरवत असतानाच तिन्ही बालकांनी अचानक कर्मचाऱ्यांशी वाद घालत झटापट सुरू केली. कर्मचाऱ्यांच्या हातातून सुटका करून घेत त्यांनी तेथून धूम ठोकली. घटना लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यातील एका बालकाला घटनास्थळाजवळच पकडण्यात यश आले. तर दुसरा बालक चिंचवडच्या दिशेने पळून गेला होता.
कोरेगाव पार्क पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेत चिंचवड परिसरातून त्याला ताब्यात घेतले. मात्र, तिसरा बालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, अशी शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस फरार बालकाचा शोध घेण्यासाठी विविध पथकांच्या माध्यमातून तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कोरेगाव पार्क पोलिसांकडून फरार बालकाचा शोध तसेच घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे.























