विश्रांतवाडीतील रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी डाॅक्टर महिलेकडून लाच
marathinews24.com
पुणे – शहरातील विश्रांतवाडीतील खासगी रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. कारवाई न करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०, रा. शुभ गेटवे सोसायटी, विमाननगर) यांना अटक करण्यात आली. याबाबत एका डाॅक्टर महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिरवणुकीची वेळ नव्हे, सुरक्षेला प्राधान्य दिले- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टर महिलेचे रुग्णालय विश्रांतवाडीतील धानोरी भागात आहे. संबंधित रुग्णालयात अनियमितता असल्याबाबतचा तक्रार अर्ज पुणे महापालिकेच्या नगर रस्त्यावरील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डाॅ. चकोर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. संबंधित तक्रार अर्जाची चौकशी डाॅ. चकोर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी डाॅ. चकोर हे संबंधित रुग्णालयात चौकशीसाठी आले. ‘संबंधित रुग्णालयाची चौकशी करुन अहवाल वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवावा लागेल. त्रूटी आढळून आल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होईल. कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच द्यावी लागेल’, असे डाॅ. चकोर यांनी तक्रारदार डाॅक्टर महिलेला सांगितले. त्यानंतर डाॅ. चकाेर यांनी तक्रारदार डाॅक्टर महिलेकडून १५ हजार रुपयांची लाच घेतली.
Pune Municipal Corporation महिला डाॅक्टरला ३० हजार रुपये घेऊन नगर रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी (२६ सप्टेंबर) बोलाविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डाॅ. चकोर यांच्या दालनाच्या परिसरात सापळा लावून ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या डाॅ. चकोर यांना पकडले. डाॅ. चकोर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक डाॅ. शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नीता मिसाळ, सतीश वाळके, हवालदार प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, वनिता गोरे, चंद्रकांत कदम यांनी ही कारवाई केली.




















