येरवडा, मुंढवा आणि हडपसरमधील घटना
marathinews24.com
पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौक, मुंढवा, हडपसर भागातील हांडेवाडी रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौकात रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी तरुणाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. देवीदास सोनवणे (वय २५, रा. माऊलीनगर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. याबाबत दत्ता अशोक साेनवणे (वय ३५) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रील बनवण्यासाठी कोयता नाचवणारे दोघे जेरबंद – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवीदास सोनवणे १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास निघाला होता. येरवड्यातील गुंजन चित्रपट चौकात रस्ता ओलांडत असताना भरधाव मोटारीने त्याला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या देवीदास याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक थोरवे तपास करत आहेत.
मुंढवा- मांजरी रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अनुज बैरागी (वय ३४) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव अहो. याबाबत त्याच्या वडिलांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनुज बैरागी मूळचा उत्तराखंडमधील आहे. तो कामानिमित्त पुण्यात आला आहे. ३० सप्टेंबर रोजी तो दुचाकीवरुन मुंढवा-मांजरी रस्त्याने निघाला होता. रात्री नऊच्या सुमारास टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करत आहेत.
रिक्षाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसरमधील हांडेवाडी परिसरात घडली. अकील मुल्ला (वय ६०)असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा मोहम्मद (वय ३१) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुल्ला हे हांडेवाडी परिसरातील एका सोयाटीत राहायला आहेत. २४ सप्टेंबर रोजी मुल्ला हे दुपारी पावणेएकच्या सुमारास हांडेवाडी रस्त्यावरुन निघाले होते. रिक्षाचालकाने त्यांना धडक दिली. अपघातात मुल्ला जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.























