ग्रामीण पोलिसांकडून दोघे अटकेत
marathinews24.com
पुणे – कौटुंबिक वादातून साडूचा खून करुन मृतदेह वरंधा घाटात टाकण्यात आला. बेवारस अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. संतोष उर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर (वय ४०, रा. सोनल हाईट्स, वडगाव बुद्रुक) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष भिकू पिसाळ (वय ४३, रा. साई प्लॅनेट, वडगाव बुद्रुक, मूळ रा. रांजे, ता. भोर), अनिकेत चंद्रकांत पिसाळ (वय २९, रा. अनंतसृष्टी, आंबेगाव खुर्द ) यांना अटक करण्यात आली.
धक्कादायक… सेक्स करतानाचे व्हिडिओ मित्रांना पाठवले – सविस्तर बातमी
संतोष पासलकर आणि संतोष पिसाळ हे साडू आहेत. पासलकर काही कामधंदे करत नव्हता. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. पासलकर दारु पिऊन पत्नीला मारहाण करायचा. पासलकर आणि पिसाळ हे जवळच राहत होते. पासलकर दाम्पत्यातील भांडणे सोडविण्यासाठी पिसाळ मध्यस्थी करायचा. ही बाब पासलकरला खटकत होती. २३ एप्रिल रोजी पासलकरने पत्नीला पुन्हा मारहाण केली.
त्यानंतर पिसाळ भांडणे सोडविण्यासाठी घरी गेला. रात्री सोसायटीच्या वाहनतळावर त्यांच्यात वाद झाला. पिसाळ आणि त्याच्या नातेवाईक अनिकेत पिसाळ यांनी पासलकरला मारहाण केली. त्याच्या डोक्यात गज मारला. गज मारल्यानंतर पासलकर गंभीर जखमी झाला. त्यानंतर पासलकर मरण पावल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरविले. मोटारीत पासलकरचा मृतदेह टाकून ते भोर परिसरातील वरंधा घाटात आले. वरंधा घाटातील निर्जन ठिकाणी पासलकरचा मृतदेह टाकून आरोपी पिसाळ पसार झाले. वरंधा घाटात गुरांना घेऊन जाणाऱ्या एकाने मृतदेह पाहिला. मृतदेहाला शिर नव्हते, तसेच प्राण्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलीस पाटील सुधीर रामचंद्र दिघे (वय ५२, रा. वारवंड, ता. भोर) यांना कळविण्यात आली. दिघे यांनी याबाबत भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता. कौटुंबिक वादातून पिसाळने साडू पासलकर याचा खून केल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी अमोल शेडगे यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पिसाळला संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत पिसाळने पासलकरचा कौटुंबिक वादातून खून केल्याची कबुली दिली. पासलकरच्या कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहायक फौजदार हनुमंत पासलकर, हवालदार अमाेल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, धीरज जाधव, धर्मवीर खांडे यांनी ही कामगिरी केली.