दस्तनोंदणीस नकार दिल्याने मारहाणीचा प्रकार
marathinews24.com
पुणे – Pune Crime News : दस्तनोंदणीस नकार दिल्याच्या रागातून आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत रवींद्र कोळी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एका वकिलासह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
केतन अगरवाल खून प्रकरणाचा सखोल तपास सुरू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळी हे वरिष्ठ लिपिक आहेत. गेल्या महिनाभरापासून ते आंबेगाव येथील सहदुुय्यम निबंधक कार्यालयात प्रभारी सहदुय्यम निबंधक म्हणून काम सांभाळत आहेत. शुक्रवारी सायंकाळी आरोपी वकील, त्याचा भाऊ, तसेच आणखी एक जण दस्तनोंदणीसाठी कार्यालयात आले. दस्तनोंदणीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे जोडली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दस्तनोंदणी करता येणार नाही, असे काेळी यांनी तिघांना सांगितले.
त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपी वकिलासह साथीदारांनी कोळी यांना मारहाण केली. त्यांना बांबूने मारहाण केली. मारहाणीत ते जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
























