आश्रमात राहणारी मुलगी पोरकी; नगरसेवक मारूती आबा तुपे यांचा दावा
marathinews24.com
पुणे – विषारी हातभट्टी दारू प्रकरणाने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली असतानाच रविवारी आणखी एका मृत्यूची नोंद झाली. रोजंदारी करून मुलीचा सांभाळ करणाऱ्या ४२ वर्षीय सचिन सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नीचे छत्र आधीच हरपलेल्या त्यांच्या सातवीत शिकणाऱ्या मुलीवर आता पितृछत्रही हरपल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आईचे ऐकले असते तर…! विषारी दारूने घेतला एकुलत्या मुलाचा जीव – सविस्तर बातमी
सचिन सोनवणे (वय ४२) हे हडपसर भाजी मंडईत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. पत्नीचे यापूर्वी निधन झाल्यानंतर त्यांची मुलगी स्थानिक आश्रमात राहून शिक्षण घेत आहे. दिवसभर काम करून रात्री आश्रमात मुक्काम करणाऱ्या सचिन यांचे आयुष्य संघर्षमय होते. मुलीचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ते कष्टाची कामे करून संसाराचा गाडा ओढत होते. भाजपाचे नगरसेवक मारुती तुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यांना पांढरे मळा परिसरातील हातभट्टी दारूचे व्यसन होते. २७ मे रोजी त्यांनी तेथील अड्ड्यावरून दारू घेतली होती. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. परिसरात विषारी दारूमुळे मृत्यू होत असल्याची माहिती त्यांनाही होती; मात्र आपल्याला किरकोळ त्रास होत असल्याचे समजून त्यांनी उपचाराकडे दुर्लक्ष केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. शनिवारी रात्री त्यांना अधिक त्रास सुरू झाला.
पहाटे रुग्णवाहिकेतून त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. सोनवणे यांच्या मृत्यूने आश्रमातील वातावरणही हळहळून गेले आहे. आईनंतर आता वडिलांचाही आधार हरपलेल्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तिच्या डोळ्यांसमोर आता फक्त आठवणी उरल्या आहेत. रोज मजुरी करून मुलीसाठी जगणारा बाप विषारी दारूच्या विळख्यात गेला आणि एका निष्पाप मुलीचे आयुष्य पुन्हा एकदा अंधारात ढकलले गेले. पांढरे मळा येथील विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा वाढत असताना प्रत्येक मृत्यूमागे उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, अनाथ झालेली मुले आणि कोलमडलेले संसार समोर येत आहेत.






















