आरोपी ताब्यात, पीडितेचे समुपदेशन सुरू-पोलिसांची माहिती
marathinews24.com
पुणे – कुरिअर बॉयने अंगावर स्प्रे माारून तरुणीला बेशुद्ध करीत बलात्कार प्रकरणाचा भलताच उलगडा झाला असून, संबंधित तरूणीने मित्रासोबत संमतीनेच शरीरसंबंध ठेवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले असून, मागील एक वर्षांपासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान, पीडितेने पोलिसांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. मानसिक स्वास्थ चांगले नसल्यामुळे आपण पोलिसांकडे तक्रार केल्याची कबुली पीडितेने दिली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा उपस्थित होते.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश – सविस्तर बातमी
आरोपी तरूण आणि पीडित तरूणी एकाच समाजाचे असून, मागील एक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. २ जुलैला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कुरिअर बॉयने अंगावर स्पे्र मारून बलात्कार केल्याची तक्रार २२ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची १० पथके तपासासाठी तैनात केली. सीसीटीव्ही फुटेजनुसार मिळालेला फोटो पीडितेला दाखविला असता, तिने तो आरोपी नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित सोसायटीत राहणार्या ४४ फ्लॅट धारकांकडे विचारपूस केली होती. मात्र, त्यांनीही आरोपी सोसायटीत कधी पाहिले नसल्याचे सांगितले. दरम्यान, सोसायटीत दोन दिवसांत ज्या कंपनीने विविध वस्तूंची डिलीव्हरी केली होती. त्या डिलीव्हरी बॉयचा संपुर्ण डेटा संकलित केला.
पोलिसांची दिशाभूल, ६०० कर्मचारी-अधिकारी कामाला लावले
गुन्हे शाखेचे २०० आणि ५०० स्थानिक पोलीस, १०० पोलीस अधिकार्यांची फौज गुन्ह्याची उकल करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करीत होती. तब्बल ५०० लोकेशनचे सीसीटीव्ही तपासून त्याचा डेटा एकत्रित करण्यात आला. त्यानुसार मिळालेल्या फोटोतील एकजण बाणेर आयटी ऑफिसमधून बाहेर पडताना पोलिसांना दिसून आला. त्यानुसार ४ जुलैला दुपारी तीनच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. टेक्निकल डेटा तपासाला असता, तो आरोपी कोंढव्यातील घटनास्थळी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, चौकशीत त्याने पीडित माझी मैत्रिण असून, मागील एक वर्षांपासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. तिच्यासोबत असलेले चॅटही त्याने पोलिसांना दाखविले. त्यानंतर पोलिसांनी पीडितेकडे विचारपूस केली असता, मानसिक स्थिती खराब झाल्यामुळे पोलिसांची दिशाभूल केल्याची कबुली तरूणीने दिली आहे.
पीडितेने फोटो एडिट केला, कॅप्शनही दिले
तरूणीने मित्राला घरी बोलावून समंतीनेच शरीरसंबंध ठेवले असून, त्याच्यासोबत फोटो काढला होता. मात्र, तरूण निघून गेल्यानंतर तिने फोटोत छेडछाड करीत शब्द लिहले असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच पीडितेचा मित्र घरात प्रवेश करताना त्याने कोणताही स्प्रे वापरून तिला बेशुद्ध केले नाही. दोघेही सव्वा ते दीड तास फ्लॅटमध्ये असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
आरोपी आणि पीडित मागील एक वर्षांपासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलीचे मानसिक स्वास्थ खराब झाल्यामुळेच तिने पोलिसांची दिशाभूल केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे. याप्रकरणी तिचे समुपदेशन सुरू असून, प्रकरणातील पोलिसांची भूमिका लवकरच स्पष्ट केली जाणार आहे. – अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर