बुधवार पेठेतील सपना बिल्डिंगवर पोलिसांचा छापा; दोन बांगलादेशी तरुणींची सुटका
पुणे – शहरातील बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायातून दोन बांगलादेशी तरुणींची सुटका करून बांगलादेशी महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने अटक केली. शनी मंदिराजवळील सपना बिल्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शुली बेगम अफजल शेख ऊर्फ प्रिती रणजीत पात्रा (वय ३९, रा. सपना बिल्डिंग, बुधवार पेठ, मूळ रा. गाव सुबोडा, थाना-अभयनगर, जि. जेसोर, बांगलादेश) रणजीत गदाधर पात्रा (वय ४२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
दारू पिण्यास पैसे न दिल्याने डोक्यात दगड घातला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १२) अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला सपना बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने माहितीची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकून वेश्यागमनासाठी आणलेल्या दोन बांगलादेशी महिलांची सुटका केली. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, एसीपी शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलिस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, अविनाश कोंढे, रेश्मा कंक आणि वैशाली इंगळे यांच्या पथकाने कारवाई केली.





















