महिलेसह जेष्ठाला सायबर चोरट्यांनी घातला गंडा
Marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांना जाळ्यात अडकवून फसवणूकीचे सत्र कायम आहे. याबाबत सातत्याने जनजागृती करुनही उच्चशिक्षितांपासून उच्चपदस्थ अधिकार्यांपर्यत अनेकजण आमिषाला बळी पडत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस सायबर चोरट्यांच्या विळख्यात पुणेकर अडकत चालले असल्याचे दिसून आले आहे. सायबर चोरट्यांनी महिलेसह दोघांची ६२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : वरदळीच्या मार्केट यार्ड परिसरात वाहतुकीत बदल – सविस्तर बातमी
तक्रारदार ४६ वर्षीय महिला शिवाजीनगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर मार्च २०२५ मध्ये संपर्क साधला. शेअर बाजारातील दलाल असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर महिलेला पैसे गुंतविण्यास सांगितले. महिलेने पैसे गुंतविल्यानतंर तिला सुरुवातीला परताव्यापोटी काही रक्कम दिली. परतावा खात्यात जमा झाल्यानंतर महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात महिनाभरात वेळावेळी ३१ लाख ६० हजार रुपये जमा केले. त्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला नाही. चोरट्यांशी संपर्क होत नसल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सूर्यवंशी तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांनी बाणेर भागातील ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली आहे. तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक बाणेर भागातील सोसायटीत राहायला आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी त्यांना पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यांनी वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ३१ लाख २० हजार रुपये जमा केले. त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत. दरम्यान, शेअर बाजारात गुंतणवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांनी यापुर्वीही पुणे परिसरातील नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला आहे. बतावणीकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.