३ गुन्हे उघडकीस, पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एस.टी. स्थानकात प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणार्या महिलेला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणून २ लाख ७० हजारांचे दागिने जप्त केले आहेत. गर्दीचा फायदा घेउन महिलांचे दागिने चोरी करीत असल्याची कबुली संबंधित महिलेने दिली आहे. भाग्यश्री जितेश कसबे (वय ४० रा. कळसगांव गावठाण विश्रांतवाडी पुणे,मुळ-विकासनगर लातुर ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
पुण्यात तब्बल १ कोटी १३ लाखांवर गुटखा, सिगारेट जप्त – सविस्तर बातमी
स्वारगेट एसटी स्थानकासह पीएमपीएल बसस्थानकात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी परिसरात गर्दीच्या वेळी प्रतिबंधक गस्त घालण्याचे आदेश तपास पथकाला दिले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस अंमलदार सुजय पवार, संदिप घुले हे १६ मे रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार सुजय पवार व संदीप घुले यांना शिवाजीनगर पीएमपीएल बस स्टॉपजवळ तोंडाला पांढरा प्रिटेंड स्कार्फ बांधलेला, अंगावर चॉकलेटी रंगाचा टॉप व पिवळया रंगाचे लॅगीन्स परिधान केलेली महिला चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली.
तपास पथकाचे एपीआय राहुल कोलंबीकर यांनी दोन महिला अंमलदारांना बोलावुन घेत परिसरात सापळा रचला. त्यावेळी पोलिसांना पाहून संशयित महिला पळून जाण्याचा प्रयत्न करीत होती. महिला अमलदारांनी पाठलाग करून आरोपी भाग्यश्री जितेश कसबे हिला ताब्यात घेतले. महिला तिच्याकडील पर्सला सारखा हात लावुन पर्स पाठीमागे लपवत असल्याचे दिसुन आले. तिच्या पर्सची तपासणी केली असता, त्यामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. चौकशीत तिने मागील महिन्यांपासुन स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीमध्ये बसमध्ये चढणार्या प्रवासी महिलांचे अंगावरील दागिने चोरी केल्याची कबुली दिली.
चोरी केलेले दागिने विक्रीसाठी घेउन चालल्याचे तिने सांगितले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, एपीआय राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दिपक खेंदाड, प्रशांत टोणपे, हनुमंत दुधे यांनी केली.