स्वारगेट, खडकी परिसरात चोरीच्या घटना
marathinews24.com
पुणे – पीएमपीएलसह एसटीप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलांचे दागिने चोरून नेले आहेत. या घटना स्वारगेट, खडकी परिसरात घडल्या आहेत. याप्रकरणी चोरट्यांविरूद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पीएमपीएल आणि एसटी प्रवासात महिलांच्या पर्स, पिशवीतून, हातातील सोन्याच्या पाटल्या कापून नेल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रवास करावा की नाही, असा प्रश्न महिलांमध्ये आहे.
हवाई दलाच्या जवानाच्या वेशात करत होता वावर; संबंधित व्यक्तीला पुण्यात अटक – सविस्तर बातमी
गावाहून आल्यानंतर नातलगाच्या घरी जाण्यासाठी पीएमपीएल बसमध्ये प्रवेश करीत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने महिलेच्या हातातील ५० हजारांची सोन्याची पाटली कापून नेली. ही घटना १५ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास स्वारगेट पीएमपीएल बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी सांगलीतील राहणार्या ५३ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला मूळची सांगलीची असून, कामानिमित्त पुण्यातून सासवडला जाण्यासाठी बसमध्ये प्रवेश करीत होती. त्यावेळी चोरट्याने गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या हातातील ५० हजारांची सोन्याची पाटली कापून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
वाकडेवाडी एसटी स्थानकातून गावी जाण्यासाठी एसटीत प्रवेश करीत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या पर्समधून १ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १८ मे रोजी सकाळी साडेनउच्या सुमारास वाकडेवाडी एसटी स्थानकात घडली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये राहणार्या ४२ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला पिंपरीत राहायला असून, १८ मे रोजी सकाळीच गावी जाण्यासाठी वाकडेवाडी एसटी स्थानकात थांबली होती. इच्छितस्थळी जाण्यासाठी गाडी आल्यामुळे महिला गर्दीतून एसटीत प्रवेश करीत होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून दीड लाखांवर किमतीचे दागिने चोरून नेले. गाडीत बसल्यानंतर महिलेला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार चक्रे तपास करीत आहेत.