आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – प्रेम प्रकरणातून त्रास दिल्याने तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल भैरम काळे (वय २१, रा. हुडको काॅलनी, शिरुर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत विशाल काळे याच्या बहिणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन चैत्राली उर्फ चैतू चंदू भोसले, राेहित चंदू भोसले, ऋषीकेश चंदू भोसले, कोला काळूराम काळे, परशान काळूराम काळे (सर्व सध्या रा. कोरेगाव पार्क , मूळ रा. हुडको काॅलनी, शिरुर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या रोहित्राची तोडफाेड करुन तांब्याची तार चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या २३ वर्षीय तरुण आणि आरोपी हे नातेवाईक आहे. कोरेगाव पार्क परिसरातील सिग्नलजवळ थांबून ते फुले, तसेच किरकोळ वस्तूंची विक्री करतात. तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरुन आरोपींनी त्याला त्रास दिला होता. आरोपींनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. आरोपींनी त्याला मारहाण केली होती. आरोपींच्या त्रासामुळे तरुणाने कोरेगाव पार्क परिसरात १ जून रोजी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींच्या त्रासामुळे भावाने आत्महत्या केल्याची फिर्याद त्याच्या बहिणीने नुकतीच दिली. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वनवे तपास करत आहेत.
























