नामांकित फर्ग्युसन रोडवरील शनिवारी मध्यरात्रीची घटना – सीपी साहेबांशी बोललोय, कारवाई दाखवतोच, तरुणांचा अरेरावीपणा
marathinews24.com
पुणे – शहरातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयासमोरील रोडवर मध्यरात्रीनंतरही तरुणांना जमवून गिटार वादन थांबवून पोलिसांनी संबंधितांना घरी जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने दोन तरुणांनी आमच्या मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यासोबत ओळखी आहेत, असे म्हणून पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यात महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी उद्धट वर्तन केल्याची घटना घडली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार पिंक इ रिक्षाचे वितरण – सविस्तर बातमी
विशाल दत्तात्रय हळंदे ( वय ३०, रा. प्रतिक अपार्टमेंट, प्रतिकनगर, कोथरूड) आणि हर्षल महेंद्र शिंदे (वय २०, रा. हरीओम अपार्टमेंट, गुजरात कॉलनी, कोथरूड) यांच्यावर सरकारी कामात बलपूर्वक अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार आकाश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.
विशाल हळंदे याचा कापड व्यवसाय आहे तर, हर्षल शिंदे हा एमबीएचे शिक्षण घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रोडवर काही दिवसांत रात्री उशिरापर्यंत तरुण-तरुणी गटागटाने फिरतात. त्यामुळे परिसरातील दुकाने बंद झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत फुटपाथवर विक्रेते वस्तूची विक्री करतात. रात्री उशिरापर्यंत फुटपाथवर विक्री सुरु असते. त्यातून नेहमी भांडणे मारामारीचे गुन्हे वाढू लागले होते. त्यापार्श्वभूमीवर पोलिस मार्शल आकाश सोनवणे व हिरेमठ हे दुचाकीवरून पेटोलिंग करत फर्ग्युसन रोडवर गेले. एफसी कॉलेजच्या मेन गेटच्या समोर फुटपाथवर १०० ते १२५ तरुण-तरुणींचा गट जमलेला होता. एक जण गिटार वाजवत होता. बाकीचे लोक ऐकत थांबले होते. मध्यरात्र असल्याने पोलिसांनी सर्वांना जोराने आवाज देत रात्रीचे १२ वाजून गेले आहेत. आता इथे थांबू नका, आपआपल्या घरी निघून जावा, असे सांगितले. त्यावर बरेच मुले तिथून निघून गेली. दोघे जण तेथेच थांबून विरोध करत होती. त्यांनी विशाल हळंदे आणि हर्षल शिंदे असे नाव सांगितले. विशाल हळंदेने पोलिसांना शिवीगाळ करुन तुम्ही कशी नोकरी करता तेच मी पाहतो, मी पण प्रेसमध्ये आहे. माझ्या पण मोठ्या आयपीएस अधिकाऱ्याशी ओळखी आहेत, असे धमकावले. तसेच विशाल हळंदे याने पोलिसांच्या अंगावर जाऊन त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी दोघांना डेक्कन पोलिस ठाण्यात नेले.
डेक्कन पोलीस ठाण्यात नाईट राऊंडवर असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार भेटीसाठी आल्या होत्या. त्यावेळी विशाल हळंदे आणि हर्षल शिंदे यांनी त्यांनाही अरेरावी करत, तुम्ही आम्हाला कुठे बसायचे ते शिकवू नका. मी सीपी साहेबांशी बोललोय, तुम्हाला काय कारवाई करायची आहे, ती करा. मी पण माझी कारवाई करतो, तुम्हाला मी काय आहे, ते दाखवतोच, असे म्हणत उद्धट वर्तन केले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण तपास करत आहेत.
नळ स्टॉप परिसरात छोटी- मोठी उपहारगृह रात्रभर तेजीत
पोलिसांनी एफसी रोडवरील मुलांना हटकल्याने असताना, दुसरीकडे दररोज नळस्टॉप चौकात मात्र खुलेआम चहा-नाष्ट्याची दुकाने रात्रभर सुरू असतात. त्यामुळे कर्वे रस्त्यावर चौकात दुतर्फा मोठी गर्दी असते. मात्र, या ठिकाणी पोलिस आणि
व्यावसायिकांची ‘आर्थिक सेटिंग’ असल्याने ही दुकाने बंद करण्याची पोलीस तसदी घेत नाहीत. तसेच संबंधित चौकात येऊन मुला-मुलींना हटकत देखील नाहीत. नळस्टॉप चौकाचा काही भाग हा डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांनी तेथे एवढीच कार्यतत्परता दाखवणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.