पसार आरोपी अटकेत
marathinews24.com
पुणे – कोथरूड भागात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. साेमवारी रात्री गोपीनाथनगर भागात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. साहिल दशरथ कांबळे (वय २५, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सुयश शिरसाट आणि ओम साळुंखे यांना अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘एपीके’ फाईल पाठवून ५० हजारांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सोमवारी रात्री साहिल हा गोपीनाथनगर परिसरात थांबला होता. त्या वेळी आरोपी शिरसाट आणि साळुंखे तेथे आले. दोघांनी कांबळेला शिवीगाळ केली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. गजबजलेल्या रस्त्यावर कांबळे याच्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हा प्रकार पाहताच नागरिकांमध्ये घबराट उडाली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली.
कात्रज भागात रिक्षाचालकावर शस्त्राने वार
कात्रज बाह्यवळण मार्गावर रिक्षाचालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज माणिक काळे (वय ३०, रा. दुगड चाळ, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि रिक्षाचालक काळे यांच्यात वाद झाले होते.
रिक्षाचालक काळे हा बाह्यवळण मार्गावरुन सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरील दत्तनगर येेथील भुयारी मार्ग परिसरात रिक्षाचालक काळे याला आरोपींनी गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. या घटनेत काळे गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींचा शाेध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.





















