दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी
marathinews24.com
पुणे – उड्डाणपुलाच्या कठड्यावर दुचाकी आदळून तरूण ठार – पौड फाटा चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला. प्रणव गणेश पालकर (वय २०, रा. बावधन) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अथर्व अनिल वैद्य (वय १९, रा. सवाना हाऊसिंग सोसायटी, वाघोली) जखमी झाला.
दुचाकीचा धक्का लागल्याने पिस्तुलातून गोळीबार, ६ जण अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्रणव पालकर आणि त्याचा मित्र अथर्व वैद्य हे २ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्य सुमारास पौड फाटा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार प्रणव याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातात प्रणव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. अपघाताची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी अवस्थेतील प्रणव आणि त्याचा मित्र अथर्व याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रणव याचा रुग्णालयात मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांंनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताच्या घटनेची नोंद कोथरूड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.
पौड फाटा येथील उड्डाणपुलावर भरधाव दुचाकी आदळून दुचाकीस्वार मृत्युमुखी पडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वर्षभरापूर्वी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला होता. कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालय परिसरात भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी सोसायटीच्या सीमाभिंतीवर आदळून एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती.
पीएमपी प्रवासी ज्येष्ठाच्या खिशातून रोकड लंपास
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड लांबविल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिासांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे वढू खुर्द गावात राहायला आहेत. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ते पीएमपी बसने प्रवास करत होते. बसमध्ये गर्दी होती. नगर रस्त्यावर ज्येष्ठाच्या खिशातून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड लांबविली. वाघोली परिसरात ते पीएमपी बसमधून उतरल्यानंतर खिशातील रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस हवालदार यू. आर. धेंडे तपास करत आहेत. पीएमपी प्रवाशांकडील दागिने, रोकड चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. प्रवासी महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून, चोरटे गर्दीत महिलांच्या हातातील बांगड्या कटरने कापतात, तसेच गर्दीत पिशवीत ठेवलेले दागिने, रोकड लांबविण्याच्या घटना घडतात.






















