दूरध्वनी सेवा विस्कळीत
marathinews24.com
पुणे – बीएसएनएलची केबल चोरीला गेल्याची घटना कोथरूड भागात घडली आहे. केबल चोरीमुळे कोथरूड भागतील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली होती. याबाबत कैलास माधवराव पायमोडे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेम्पो चोरणार्या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायमोडे हे एरंडवणे भागातील बीएसएनएल कार्यालयात मंडल उपअभियंता आहेत. देखभाल दुरुस्ती करणार्या कर्मचार्यांनी कर्वे पुतळा चौकातील जेली फिल्ड कॉपर केबल तुटल्याचे पाहिले. ही केबल तुटल्यामुळे या भागातील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर देखभाल दुरुस्ती करणार्या कर्मचार्यांनी तपासणी केली. कोथरूडमधील मृत्युंजय मंदिर चौकातील बीएसएनलच्या भूमिगत केबलची तपासणी केली. तेव्हा डक्टमधील केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कोथरूडमधील कर्वे पुतळा परिसरातून केबल चोरीला गेली होती. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी चोरट्यांना अटक केली.
खासगी कंपनीतून तांब्याची तार चोरीला
हडपसरमधील खासगी कंपनीच्या आवारातून २ लाखांची तांब्याची तार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत बापू ज्ञानदेव माने (वय ४४, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माने हे खासगी कंपनीत सुरक्षारक्षक आहेत. हडपसरमधील माळवाडी परिसरात खासगी कंपनी आहे. २ मे रोजी कंपनीच्या आवारात चोरटे शिरले. चोरट्यांनी दोन लाख २० हजारांची तांब्याची तार चोरून नेली. पोलीस कर्मचारी खटके तपास करत आहेत.






















